ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे : शरद पवार
ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडत असल्याचं आज टिव्हीवर पहायला मिळत आहे. राज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आघाडीचे निर्णय महत्वाचे ठरत आहेत, राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने धाड टाकली यावर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा प्रयत्न राहिला असून संकटं आली, कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. रोगराईचे आज संकट आहे. संकट सुरुवात होण्याआधी प्रदेशाध्यक्ष यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले ते काम थांबले परंतु कोरोना संपल्यानंतर तेच काम जोमाने सुरू होईल. आम्ही शेवटच्या माणसासाठी काम करतोय हे चित्र लवकरच दिसेल. हे आमचं कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय. लोकांच्या भल्यासाठी सरकार काम करत आहे राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत असल्याची पोचपावती शरद पवार यांनी दिली.