सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (16:01 IST)

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा पुन्हा छापा , जाणून घ्या मुश्रीफ यांच्याबद्दल 10 गोष्टी

FACEBOOK/HASAN MUSHRIF
पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. त्यांचा कागल आणि पुण्य़ातील घरांवर ईडीने आज 11 जानेवारी 2023 रोजी सकाळीच छापे मारले होते, त्यानंतर 11 मार्च रोजी आज त्यांच्या कागलमधील घरावर ईडीने छापा मारला आहे. त्यांच्यावर अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आले होते.
 
गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ ते कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकारच्याही काळात मंत्रीपदी वर्णी लागलेले मुश्रीफ यांनी विकासकामांच्या जोरावर जिल्ह्यात दबदबा कायम ठेवला आहे.
 
कागलचे पहिले लोकनियुक्त उपनगराध्यक्ष मियालाल (बापुजी) मुश्रीफ याचे चिरंजीव म्हणजे हसन मुश्रीफ. कागलच्या हिंदुराव विद्या मंदिरातून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुश्रीफ यांनी 1974 मध्ये शिवाजी विद्यापीठातून बी. ए. ची पदवी घेतली.
 
वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी घराची संपूर्ण जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शाहू कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर 1985 च्या दरम्यान ते राजकारणात सक्रीय झाले.
 
1. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष
कोल्हापूरमध्ये कार्यकर्ता ते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशी मुश्रीफ यांच्या राजकारणाची सुरूवात झाली. पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आजवर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम आहेत.
 
कार्यकर्ता ते पंचायत समिती सभापती, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा 67 वर्षीय मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास सुरू आहे.
 
2. पराभवापासून सुरुवात
सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतर कागलच्या जागेसाठी अवघ्या एका वर्षासाठी पोटनिवडणूक झाली. यावेळी मुश्रीफ यांना विधानसभेसाठी पहिली संधी मिळाली.
 
मात्र पहिल्याच निवडणुकीत मुश्रीफ यांचा सात हजार मतांनी पराभव झाला. मात्र एका वर्षात त्यांनी राजकारणात चांगला जम बसवला. त्यानंतर ते साडेतीन हजार इतक्या मताधिक्याने विधानसभेत निवडून गेले.
दुर्गम वाड्या वस्त्यांत विकासकामं, जिल्ह्यात रस्ते पाणी यांच्या योजना अशा कामामधून मुश्रीफ यांनी जनमानसात वेगळा ठसा उमटवला.
 
3. सलग पाचवेळा विजय
1999 पासून सलग पाच वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत मोदींचा प्रभाव असूनही हसन मुश्रीफ यांनी कागलची एकमेव जागा राखली होती.
 
राष्ट्रवादीचा हा मुस्लीम चेहरा असलेले मुश्रीफ गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहेत.
 
4. 'शस्त्रक्रिया' करणारे आमदार
मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा, विधी व न्याय, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास अशा महत्वाच्या खात्यामध्ये उल्लेखनीय काम केलं. त्याचा फायदा झाल्याचं चित्र पाहायला मिळते.
 
उदाहरणादाखल मुश्रीफ विधी व न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी सरकारी दवाखान्यात गरजू आणि गरीब रुग्णांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केला.
 
त्यामुळं कॅन्सरसारख्या रोगावर खर्चिक शस्त्रक्रिया ही कमी दरात होऊ लागल्या. त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा होतोय.
 
'लोकांच्या तोंडाकडे न पाहता त्यांच्या पायाकडे पाहत येणाऱ्या प्रत्येक गरजूला मदत करायची,' असं मुश्रीफ सांगतात. त्यामुळं मुश्रीफ जिल्ह्यात असताना सकाळी सहा वाजल्यापासून मुश्रीफ यांच्या घराबाहेर लोकांची रीघ पाहायला मिळते.
 
मुश्रीफ यांनी आरोग्य क्षेत्रात विशेष काम केले आहे. तसंच हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरrब रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येतात.
 
5. 'राम मंदिर' आणि दर्गा बांधणारे मंत्री
नगरविकास खात्याचे राज्यमंत्री असताना तीर्थक्षेत्र योजनेच्या माध्यामातून शेकडो मंदिरांचां जिर्णोद्धार केला. राज्यातील उत्कृष्ठ बांधकाम असलेले संगमरवरी पहिले राम मंदिर बांधण्यात मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे.
 
त्यासाठी 3 कोटींचा निधी मुश्रीफ यांनी उपलब्ध करून दिला तर गहिनीनाथ दर्गाही उत्तमरित्या उभा केला आहे.
 
6. जिल्हा बँकेचे राजकारण
"मुश्रीफ यांनी स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून राजकीय कारकीर्द घडवली आहे. धडाडीचा कार्यकर्ता अशी सुरूवात केलेल्या मुश्रीफांना संघर्षाची सवय आहे", असं दैनिक लोकमतचे कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले सांगतात.
 
"मुश्रीफ यांच्यावर आजवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. पण सध्याच्या राजकारणात मुश्रीफ यांच्या बाबतीत असं होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातून फारसं काही हाती लागेल असं वाटत नाही," असं भोसले सांगतात.
 
"जिल्ह्याच्या राजकारणातही मुश्रीफ यांची चांगली पकड आहे. कागल मतदारसंघात घरोघरी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात मुश्रीफ यांनी यश मिळवलं आहे.
 
"जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संस्था ही सत्ता केंद्र आघाडीकडे असण्याचं श्रेय मुश्रीफ यांना जातं. त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणातून मुश्रीफ यांना हटवण्यासाठी विरोधी पक्षांकडून मुश्रीफ यांच्यावर असे आरोप होत असावेत," असं भोसले यांना वाटतं.
 
7. रोखठोक भूमिका
सकाळचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगले सांगतात की, "भाजपविरुद्ध रोखठोक भूमिका मांडणारा नेता म्हणूनही मुश्रीफ यांची ओळख आहे. राज्य सरकार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपकडून झालेल्या आरोपांना नेहमी केवळ मुश्रीफ प्रत्युत्तर देतात.
 
"फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा मोदींच्या विरोधातही मुश्रीफ यांनी कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे इतर बडे नेते किंवा प्रवक्ते जितकी ठाम भूमिका मांडत नाहीत. त्यापेक्षा अधिक आक्रमक उत्तर मुश्रीफ देतात. त्यामुळं भाजपकडून मुश्रीफ यांना लक्ष्य करण्यासाठी प्रयत्न झाल्याची शक्यता आहे," असं चौगले सांगतात.
तर येत्या निवडणुकीत भाजपला कागलमधून मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे यांना निवडणूक रिंगणात उतरवायचे आहे. सध्या शिवसेना आघाडीसोबत असल्यानं भाजपची लढाई थेट मुश्रीफ यांच्या विरोधात असणार आहे.
 
त्याची पूर्वतयारी म्हणूनही भाजपकडून मुश्रीफ यांच्यावर आरोप केले जात आहेत. असं लोकमतचे उपसंपादक विश्वास पाटील यांना वाटतं.
 
8. भ्रष्टाचाराचे आरोप
भाजपकडून मुश्रीफ यांना अडचणीत आणण्याची ही पहिली वेळ नाही. जिल्हा बॅंकेत घोटाळा प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. पण त्यातूनही त्यांची निर्दोष मुक्तता झाली होता.
 
2019 मध्ये मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होता. यावेळी कागलचे घर, माद्याळ इथला साखर कारखाना, कोल्हापूरमध्ये टाकाळा परिसरात राहणाऱ्या मुश्रीफ यांच्या नालगांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते.
 
त्यावेळी कागलसह कोल्हापूरमधून याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर केला. त्यावेळी सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं.
 
त्यानंतर आज पुन्हा कराड इथं सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले.
 
9. शरद पवारांनी केलं कौतुक
2009 साली मिरज इथं जातीय दंगल झाली होता. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले होते. त्यावेळी मुस्लीम असतानाही मुश्रीफ मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
 
त्यानंतर राज्यात आघाडीचं सरकार आलं. त्यावेळी मला सर्वात जास्त आनंद हा मुश्रीफ यांच्या विजयाचा झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ही आठवण सांगताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले होते.
 
10. 'शरद पवार हेच गुरू'
मुश्रीफ यांच्या सेवाभांवी वृत्तीची विरोधी पक्षांनीही दखल घेतली आहे. गेल्या निवडणूकीत खुद्द चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचं कौतुक करत जाहीर कार्यक्रमात त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण त्यावेळी शरद पवार हेच माझे गुरू आहेत, असं सांगत मुश्रीफ यांनी भाजपची ही ऑफर नाकारली होता.
 
त्यानंतर काहीच दिवसात मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा पडला होता.

Published By- Priya Dixit