शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (08:25 IST)

मुंबईत ईडीची मोठी कारवाई; 200 कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप

ईडीकडून अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत छापेमारी करण्यात आली आहे.अंमली पदार्थ विकणारा अली असगर शिराझी याच्या विरोधात ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. अली असगर हा वाँटेड ड्रग्स लॉर्ड कैलाश राजपूतचा जवळचा सहकारी असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, शिराझी याच्यावर 200 कोटी रुपयांच्या ड्रग्जची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे.
 
मिळालेल्या माहीतीनुसार, ड्रग तस्कर अली असगर शिराझी अंधेरी परिसरात वास्तव्याला असून त्याचं घर आणि ऑफिस याठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेनं याच वर्षी मे महिन्यात शिराझीला अटक केली होती. कुरिअर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डममध्ये 8 कोटी रुपये किमतींच्या केटामाइन आणि व्हायग्राची तस्करी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अली असगर शिराझी या वाँटेड व्यक्तीला दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावरुन पकडण्यात आलं होतं.
 
 गुन्हे शाखेनं त्याच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी आणि त्यानंतर त्याला यावर्षी ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
अली असगर शिराझीशी संबंधित सात ठिकाणी छापे
अली असगर शिराझीशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकण्यात आलेत आणि काही इतर ठिकाणी छापे अजुनही सुरू आहेत. या वर्षी मे महिन्यात अली असगरला अटक करण्यापूर्वी अँटी एक्सटॉर्शन सेल नं मार्चमध्ये शिराजीचा शोध सुरू केला आणि पोलिसांच्या पथकानं त्याच्या शोधासाठी जम्मू आणि काश्मीर, दिल्ली आणि देशातील अनेक ठिकाणी भेट दिली. परंतु तो सतत त्याचे गंतव्यस्थान बदलत होता. अखेर पोलिसांच्या तावडीत तो सापडलाच.
 
एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या केटामाइनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य अली असगर शिराझी याला अटक केली होती. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं 15 मार्च रोजी अंधेरी परिसरात छापा टाकून 15 किलो 740 ग्रॅम केटामाइन आणि 23 हजारांहून अधिक व्हायग्राची पाकिटं जप्त केली होती. केटामाइनची किंमत सात कोटी 87 लाख रुपये, तर व्हायग्राची किंमत 58 लाख रुपये होती.

याप्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली होती. या टोळीचा म्होरक्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर कैलाश राजपूत असून, त्याच्यासह आणखी तिघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. कैलाश राजपूत याच्या टोळीतील अली असगर शिराझी हा महत्त्वाचा आणि टोळीची जबाबदारी असलेला सदस्य. गुन्हा दाखल झाल्यानंतर अली असगर शिराझी गायब झाला होता. पण अखेर मे महिन्या अली असगर शिराझीला पोलिसांनी अटक केली होती.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor