नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा
राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसेच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री, नीती आयोग, युजीसी, नॅक यांच्याशी समन्वय करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागानी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित राष्ट्रीय सेमिनारविषयी पूर्वतयारीच्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विविध उपक्रम व नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत असताना अधिक स्पष्टता यावी आणि अधिक माहिती व्हावी, यासाठी नीती आयोगाकडे विभागाने कार्यगट निर्माण करून पाठपुरावा करावा. सध्या राज्यात 200 महाविद्यालयांमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) सुरू असून त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणाचे ब्रॅंडिंग होण्यासाठी, त्याचा सेमिनार मुंबईत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध परिसंवादाचे आयोजन, विविध सत्रात राज्यातील शिक्षणाविषयाची माहिती, योजना, उपक्रम, विविध विद्यापीठात प्रशिक्षण, अभ्याससत्राची माहितीचे प्रदर्शन भरविण्यात यावी, जेणेकरून राज्यातील उच्च शिक्षण विभागाची सकारात्मक प्रतिमा देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली जाईल. इतर शासकीय आणि खाजगी नामांकित विद्यापीठांनी विविध विषयावर दिवसभर कार्यशाळा आयोजित करावी. यात देशभरातील किमान 10 राज्यांतील विद्यापीठांना निमंत्रित करावे. या सर्व विषयांचे पुस्तक काढता येईल, असेही चंद्रकांत पाटलांकडून सांगण्यात आले.
Edited By - Ratnadeep ranshoor