महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकनाथ लोमटे महाराज यांना अटक
महिला भाविकाचा विनयभंग केल्याप्रकरणी एकनाथ लोमटे महाराज यांना पंढरपुर येथे येरमाळा पोलीसांनी अटक केली आहे.
महाराज यांच्यावर येरमाळा पोलिसात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला होता. 28 जुलै 2022 रोजी परळी येथील महिला भाविकाचा विनयभंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कळंब तालुक्यातील मलकापुर येथील तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज फरार झाले होते. न्यायालयाने आदेश दिल्याने ही कारवाई करण्यात आली.
पीडित महिला लोमटे महाराजांकडे नियमित दर्शनासाठी येत होती. 28 जुलै 2022 रोजी देखील पीडित महिला लोमटे महाराज यांच्या मठामध्ये आली असता दुपारनंतर महाराजांनी या महिलेला एका खोलीत बोलवून शरीरसुखाची मागणी केली. यावर महिलेने नकार दिल्यावर काही व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याची धमकी देत महाराजांनी महिलेचा विनयभंग केला.
ही महिला तेथून पळून गेली अशी फिर्याद पीडित महिलेने दिली. एकनाथ महाराजांविरोधात छेडछाडीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी लोमटे महाराज यांच्या विरोधात भोंदूगिरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.