गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (16:16 IST)

एकनाथ शिंदे : 'मी आणि फडणवीस 165 नाही तर 200 आमदार निवडून आणू '

मी माझ्याकडे 50 आमदार निवडून आणेलच. पण मी आणि फडणवीस दोघे मिळून 165 नाही तर 200 आमदार निवडून आणू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
 
भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, असं म्हणतात. पण, एवढ्या जणांना EDच्या नोटिसा पाठवल्या, पण कुणाला टाकलं का जेलमध्ये? नाही ना? कारण त्यांना ही लढाई प्रेमाने जिंकायची होती, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
 
ते विधानसभेत बोलत होते.
 
शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, पण माघार नाही, असंही शिंदेंनी म्हटलं आहे.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "ज्यावेळी आम्ही विधानभवनातून निघालो त्याच्या आदल्या दिवशी मी डिस्टर्ब होतो. मला जी वागणूक मिळाली त्याचे हे आमदार साक्षीदार आहेत. एकाही आमदाराने हे मिशन सुरू झालं तेव्हा विचारलं नाही कुठे चाललो? कधी येणार? सुनिल प्रभूंनाही माहिती आहे माझं कसं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला.
 
"मला अनेकांचे फोन आले. पण मी ठरवलं होतं. शहीद झालो तरी मागे फिरायचे नाही. ही छोटी मोठी घटना नाही. हे एका दिवसांत झालेली नाही. हे खूप आधीपासून सुरू झालं.
 
"एकीकडे चर्चेला माणसं पाठवायची आणि दुसरीकडे पुतळे जाळायला लावायचे. घरावर दगडफेक करायला सांगायची. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करणारा अजून पैदा झाला नाही. दगड मारणारे हात राहणार नाहीत."
 
"मी 30 ते 35 वर्षं या एकनाथ शिंदेनं जीवाचं रान केलंय. रक्ताचं पाणी केलंय. मी कधीही पदाची लालसा केली नाही. अन्याय होतो तेव्हा मी शांत बसत नाही," असंही शिंदे म्हणाले.
 
माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला पण बाप म्हणून मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी संघटनेला वेळा दिला. शिवसेनेला वेळ दिला, असंही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "मी खूप मेहनत केली. त्यावेळी लेडीजबारचा सुळसुळाट होता. मी पोलिसांना अर्ज करून खूप प्रयत्न केला. महिला शिव्या द्यायच्या. मी स्वतः 16 लेडीज बार तोडले. माझ्यावर 100 केसेस आहेत. त्यावेळी गँगवॉर सुरू होतं मुंबईत. मला ठार करण्याचा प्रयत्न झाला. दिघे साहेबांनी मला वाचवलं. मी आंदोलन केलं शिवसेना वाढवली. केसेसची पर्वा केली नाही."
 
एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
* मी अनेकदा देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये राजीनामा दिला होता. तुम्ही म्हणालात एमएसआरडीसीचं खातं का दिलं? खातं देण्याचं काम यांचं नव्हतं. पण देवेंद्र फडणवीसांनी मला समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली.
* देवेंद्र फडणवीस शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देणार होते. गडकरींनीही सांगितलं. पण ते पद मला मिळणार नव्हतं ते माहिती होतं.
* एकदा मंत्रालयात बोलताना अजितदादांना मी विचारलं होतं. दादांनी सांगितले, तुमच्या नावाला आमच्याकडून विरोध नव्हता.
* आम्ही कालही शिवसैनिक, आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिकच राहणार आहोत.
* माझ्या खात्याच्याही अनेक बैठका अजितदादा घेत होते. पण त्यांना मी कधीच रोखलं नाही. कारण काम करत होता तो माणूस. माझ्या खात्यात अनेकजण हस्तक्षेप करत होते.
 
'चार लोकांच्या टोळक्यांनी उद्धव साहेबांना भरकटवलं'
जे आमच्या मतावर निवडून येतात, त्या चार लोकांनी उद्धव ठाकरेंना बावळट केले, असं मत शिवसेने नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय.
 
विधानसभेत बोलताना पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. सगळे तक्रार करायचे कामं होत नाही. एकनाथ शिंदेंना सगळे सांगायचे. कोरोना आला एकनाथ शिंदेंनी सगळ्या आमदारांना आमच्या भागातली परिस्थिती विचारली. आम्ही नगरपंचायतीमध्ये चौथ्या नंबरला गेलो. तेव्हा शिवसेना संपत चालली नव्हती. आम्ही 302, 307 चे गुन्हे अंगावर घेतले आहेत. आम्ही टाळ्या वाजवून आमदार नाही झालो.
 
"आमचे कोणी फोन उचलत नव्हतं. एक मंत्री तर असा आहे, आम्ही कोण आहोत हे ओळखायला तयार नाही. अजित पवारांचा हेवा वाटतो. 6 वाजता टेबलवर असतो. आमचे कोणी फोन घेत नाही.
 
"एकनाथ शिंदे गेले त्यानंतर आम्ही 20 आमदार साहेबांकडे गेलो. साहेब विचार करा. ते म्हणाले तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पण जा. हे असं करून चालत नाही. आम्ही तर लोकांना मान्य असलेला निर्णय केलेला आहे. चार लोकांच्या टोळक्यांनी आमच्या उद्धव साहेबांना भरकटवलं. आम्हाला डुकरं म्हणतात. आमच्या डुकरांची मतं घेऊन खासदार होतात."
 
शिंदे सरकारचं विधानसभेत बहुमत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. भाजप, शिंदे गट, बविआ, प्रहार आणि अपक्षांचे एकूण 164 आमदारांचा पाठिंबा शिंदे सरकारला मिळाला.
 
महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली.
 
सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव मांडला आणि भरत गोगावलेंनी अनुमोदन दिलं. शिरगणतीने बहुमताची चाचणी पार पाडली.
 
हे आमदार बहुमत चाचणीला अनुपस्थित होते -
कॉंग्रेस
 
अशोक चव्हाण
विजय वडेट्टीवार
प्रणिती शिंदे
मोहन हंबारडे
झिशान सिध्दीकी
धीरज देशमुख
कुणाल पाटील
राजू आवळे
शिरीष चौधरी
जितेन अंतापूरकर
 
राष्ट्रवादी काँग्रेस
अनिल देशमुख
नवाब मलिक
दत्तात्रय भरणे
दिलीप मोहीते
अण्णा बनसोडे
बबन शिंदे
 
भाजप
मुक्ता टिळक
लक्ष्मण जगताप
 
MIM
मुफ्ती इस्माईल
 
समाजवादी पार्टी
अबू आझमी
रईस शेख
बहुमत सिद्ध होताच खालील नेत्यांनी भाषणं केली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे...
 
देवेंद्र फडणवीस :
* एकनाथ शिंदे हे कर्मावर विश्वास असणारे कुशल संघटक आहेत.
* सीमाप्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंनी नेता म्हणून पुढे आले आणि सक्रीय सहभाग घेतला
* 40 दिवस सीमा प्रश्नासाठी कारावास भोगला
* एकनाथ शिंदे नगरसेवक, सभागृह नेता, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री आणि आता मुख्यमंत्री बनले.
* आरोग्य हा एकनाथ शिंदेंचा आवडीचा विषय. आरोग्य विभाग मिळाल्यानंतर पायाला भिंगरी लावून फिरले आणि चांगली व्यवस्था उभी केली.
* एकनाथ शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. त्यामुळे मोठा माणूस असो की लहान माणूस असो, त्यासाठी ते धावून जात.
* मी त्यांना कायम म्हणतो तुम्ही झोपता कधी आणि जेवता कधी हे समजत नाही.
* ज्याचं कोणी नाही त्यांचे दिघे साहेब आहेत. हिच शिकवण दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांना दिली. एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत आम्ही 24/7 उपलब्ध आहोत असं सांगितलं.
* कमी बोलायचं आणि काम अधिक करायचं असं हे व्यक्तिमत्त्व आहे.
* महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हाच मी सांगत होतो, अनैसर्गिक आहे.
*मी पुन्हा येईन या कवितेवरून माझी टिंगळटवाळी झाली. पण मी आलो आणि यांनाही (एकनाथ शिंदे) घेऊन आलो. एकटा नाही आलो.
* माझी टिंगळटवाळी करणाऱ्यांचा बदला घेणार आहे. माझा बदला असा की, मी त्यांना माफ केलं.
* सत्ता आमचं साध्य नाहीय, साधन आहे. सामान्य जीवनात परिवर्तन करण्यासाठी आम्हाला सत्ता हवीय.
* ज्या पक्षानं मला सर्वोच्च स्थानी बसवलं, त्या पक्षानं घरी बसण्याचा आदेश दिला असता, तरी बसलो असतो.
* एकनाथ शिंदेंची कारकीर्द यशस्वी होईलच, पण ती अधिक यशस्वी कशी होईल हे मी पाहीन.
* एकनाथ शिंदेंमध्ये आणि माझ्यात कधी दुरावा कुणाला दिसणार नाही, पॉवर स्ट्रगल दिसणार नाही, कुरघोडी दिसणार नाही.
* आमच्यातील मैत्री कायम राहिली. ती मैत्री कधीही मोडली नाही.
* जेव्हा जेव्हा सत्ता निरंकुश होते, तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो.
* हे लोक ईडीमुळेच आलेत, फक्त ते एकनाथ आणि देवेंद्र आहेत.
* महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेटमधले निर्णय तसेच ठेवून, त्यांची अंमलबजावणी करू.
 
अजित पवार :
* नेहमीचा उत्साह देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसला नाही
* देवेंद्रजी, तुम्ही वकील आहात, त्या पेशानं हे सरकार कसं चांगलं आहे सांगण्याचा प्रयत्न केलात.
* अडीच वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले आणि उपमुख्यमंत्रीही झाले.
* एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, हे सांगण्याची वेळ का येते?
* सत्ता येते-जाते, ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलं नाही.
* शिंदेमध्ये पात्रता होती, मग देवेंद्रजींच्या सरकारमध्ये एकच खातं का दिलं होतं?
* 12 आमदारांचा निर्णय राज्यपालांचा दिला नाही. आता राज्यपाल अॅक्शन मोडमध्ये आलेत.
* ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्यासोबत गेलेले एकही आमदार पुढे निवडून आला नाही.
* शिवसेनेच्या नेत्यानं पक्ष सोडल्यास शिवसैनिक त्यांच्यासोबत जात नाही, असा इतिहास आहे.
* 105 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही आणि 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते, यात नक्की काळंबेरं आहे.
* मी काम करत असताना कधीही भेदभाव केला नाही. तुम्ही सातत्याने सांगताय आम्ही अन्याय केला. नगरविकासला आत्तापर्यंत 12 हजार कोटी रूपये निधी दिला आहे.
 
 
बाळासाहेब थोरात
* राज्यात अनेक भागात दुबार पेरणीची वेळ आलीय, सत्तेच्या खेळात याकडे दुर्लक्ष झालंय.
* तुम्ही आज काय म्हणाल, पण मतदारसंघ काय बोलतोय ते पाहा जाऊन...
* सत्तेचा आनंद असतो. पण, जमता उद्या प्रश्न विचारायला मोकळी आहे.
* राज्यतल्या पाणी प्रश्नावर आजच पहिली बैठक घ्या.
 
भास्कर जाधव
* एकनाथ शिंदे हे माझे मित्र आहेत. आपण बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहात, आनंद दिघेंचे शिवसैनिक आहात हे आजही सांगताय. तुम्ही जनसामान्यांसाठी, कोकणात पूर आला तेव्हा तुम्ही काम केलं म्हणून तुम्ही आनंद दिघेंचे खरे वारसदार आहात हे मी जाहीरपणे कबूल करतो.
* आज तुमच्यासोबत 40 शिलेदार आहेत आणि बाळासाहेबांच्या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विचारांचा शिवसैनिक दुसर्‍या बाजूला उभा आहे. कोणकोणावर वार करणार?
* यात दिल्लीचा बादशाह राज्य करतोय पण यात मराठी माणूस मरतोय.
* शिवसेना जगवण्यासाठी दोन पावलं मागे या, असं आवाहन त्यांनी एकनाथ शिंदे यांना केलं आहे.
* संजय राठोडचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलत, प्रताप सरनाईक, यामीनी जाधव यांची ईडी चौकशी लावली. नियतीला काहीही चुकलेलं नाही. आज यांनाच वाचवण्यासाठी तुम्हाला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागतेय.
* एकनाथ शिंदे यांना तुमच्याबद्दल काही प्रेम आलेलं नाही. हे शिवसेना विरूद्ध शिवसेना लढवतायेत. गेले 25 वर्षं शिवसेना संपवणं हा यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तुम्ही हे होऊ देऊ नका... तेव्हा हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.
 
 
अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांची निवड अवैध असल्याचं म्हटलंय.
 
"आमच्या व्हिपचं उल्लंघन कराणाऱ्यांवर कारवाई होणार. जे पळून गेलेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण शिवसेना संपणार नाही. कुर्ल्यात इमारत पडली तेव्हा इथले स्थानिक आमदार गुवाहाटीमध्ये पार्टी करत होते. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अवैध आहे," असं ठाकरे म्हणाले.
 
शिवसेनेतील आणखी एका आमदाराची बंडखोरी
शिवसेनेतील आणखी एका आमदारानं बंडखोरी केलीय. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झालेत. संतोष बांगर यांनी शिंदे गटाला मत दिलं आहे.
 
बांगर यांच्या बंडखोरीमुळे शिंदे गटातील आमदारांची एकूण संख्या 40 वर पोहोचली आहे.
 
रविवारी (3 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन साळवी यांच्या बाजूनं मतदान केलं होतं.
 
विधानपरिषद निवडणुकीनंतर ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली, त्यावेळी या बंडखोर आमदारांवर संतोष बांगरांनी टीका केली होती. कळमनुरी या त्यांच्या मतदारसंघात जाऊन बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले होते.
 
शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहीन असं 10 दिवसांपूर्वी रडत रडत संतोष बांगर यांनी सांगितलं होतं.
गुजरातसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका होतील - संजय राऊत
"आम्ही सुद्धा तयारीला लागलोय. कायदेशीर लढाई ही त्या दृष्टीनं चालत राहील. शरद पवार म्हणतायेत किंवा इतर नेते म्हणतायेत की, नक्कीच मध्यावधी निवडणुकांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबर सुद्धा निवडणुका होऊ शकतात," असं संजय राऊत म्हणाले. दिल्लीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"शरद पवारांशी मी सहमत. महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकीच्या दिशेनं जातंय," असंही राऊत म्हणाले.
 
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
 
मूळ पक्ष शिवसेना आहे. आपण शिवसेना पक्षाच्या चिन्हावर लढून आलात. शिवसेनेनं तुमच्या जिंकण्यासाठी शर्थ केली. तुम्ही शिवसेना सोडून गेलात.
आम्ही कायदेशीर लढाई लढू. ती लढावीच लागेल. सुप्रीम कोर्टात 11 जुलैला महत्त्वाची सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टात यासंबंधी याचिका प्रलंबित असताना, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणंच बेकायदेशीर आहे.
शिवसेना म्हणजे युक्रेन नाहीय. कोणताही गट शिवसेनेत ताब्यात घेऊ शकत नाही. महाराष्ट्रात शिवसेना तीच आहे. शिवसेना कमजोर झाली, असं म्हणणं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. राज्याची जनता बाळासाहेबांचा अपमान-अवमान सहन करणार नाही. आमच्या विधिमंडळ पक्षात नक्कीच फूट पडलीय. अशा अनेक प्रसंगातून आम्ही यापूर्वी गेलोय. हा पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो. पण आम्ही त्यातून उभे राहतो.
महाराष्ट्र तोडण्याचे त्यांचे इरादे पूर्ण होणार नाहीत. भाजपने म्हटलं की महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यात एक तुकडा मुंबईचा आहे. पण शिवसेना असेपर्यंत असे होणार नाही. मुंबईच्या धनसंपत्तीवर त्यांना ताबा हवाय, त्यासाठी मुंबई हवीय.
शिवसैनिक रस्त्यावर येतील आणि लढा देतील.
बंडखोर आमदारांच्या कानशिलावर वेगवेगळी शस्त्र लावली होती. मुंबईत सैन्य उतरवलं होतं. इतक्या सुरक्षेत का फिरावं लागतंय? आणि मग ते लोकप्रतिनिधी कसे?
महाराष्ट्रातलं आताचं सरकार म्हणजे भाजपनं केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला शिवसेना फोडायची होती, ते त्यांनी करून दाखवलं.
आम्ही सुद्धा तयारीला लागलोय. कायदेशीर लढाई ही त्या दृष्टीनं चालत राहील. शरद पवार म्हणतायेत किंवा इतर नेते म्हणतायेत की, नक्कीच मध्यावधी निवडणुकांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबर सुद्धा निवडणुका होऊ शकतात.
14 किंवा आणखी खासदार असतील. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना खरी. खरी किंवा खोटी हा प्रश्नही नाही. जिथं ठाकरे, तिथं शिवसेना.
शरद पवारांशी मी सहमत. महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकीच्या दिशेनं जातंय.
हे सरकार चालेल असं भाजपला खात्री असती, तर त्यांचा मुख्यमंत्री झाला असता.
शिवसेना संपवण्यासाठी 2019 साली आम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं नाही. ते दिलं नाही, कारण शिवसेनेला तोडायचं होतं.
शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी, नार्वेकरांनी झिरवळांचा 'तो' निर्णय फिरवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आता बहुमत चाचणीचं आव्हान आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी 7 आमदार अनुपस्थित होते. यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचंही नाव होतं.
 
रविवारी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांच्या निवडीने शिंदे सरकारने पहिली मोहीम फत्ते केली आहे. पण शिवसेनेने पक्षाचा व्हिप मोडल्याप्रकरणी 39 आमदारांसंदर्भात नव्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे.
यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर रविवारी सर्व आमदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे बहुमत चाचणीमध्ये देखील सरकार नक्की यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार दीपक केसरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना-भाजप युतीचे तसेच सहयोगी पक्षांचे आमदार उपस्थित होते.
 
शिंदे सरकार आकडेवारी
 
शिंदे समर्थक आमदार 39
 
भाजप आणि अपक्ष 113
 
इतर अपक्ष आमदार 11
 
बहुजन विकास आघाडी 3
 
मनसे 1
 
शेकाप 1
 
= 168
 
महाविकास आघाडी
शिवसेना - 16
 
काँग्रेस - 44
 
राष्ट्रवादी काँग्रेस - 51
 
माकप 1
 
एकूण = 112
 
शिंदेंच्या गटनेतेपदाला मान्यता
विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटानं दिलेलं पत्र मान्य करत एकनाथ शिंदे यांचं शिवसेना विधिमंडळ गटनेतेपद तर भरत गोवावले याचं प्रतोदपद मान्य केलं आहे. यासंदर्भात 22 जून 2022 रोजी अध्यक्षांना देण्यात आलेलं पत्र अध्यक्षांनी मान्य केलं आहे.
 
कायदेशीरबाबींचा अभ्यास करून आधी नरहरी झिरवळ यांनी नटनेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी सुनील प्रभू यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याच महाराष्ट्र विधानमंडळानं जाहीर केलं आहे.
 
परिणामी आता 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.