शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (10:55 IST)

एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेतील आणखी एका आमदाराची बंडखोरी

uddhav santosh bangar
शिवसेनेतील आणखी एका आमदारानं बंडखोरी केलीय. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झालेत.
 
बांगर यांच्या बंडखोरीमुळे शिंदे गटातील आमदारांची एकूण संख्या 40 वर पोहोचली आहे.
 
रविवारी (3 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार राजन साळवी यांच्या बाजूनं मतदान केलं होतं.
 
विधानपरिषद निवडणुकीनंतर ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली, त्यावेळी या बंडखोर आमदारांवर संतोष बांगरांनी टीका केली होती. कळमनुरी या त्यांच्या मतदारसंघात जाऊन बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले होते.
 
गुजरातसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका होतील - संजय राऊत
"आम्ही सुद्धा तयारीला लागलोय. कायदेशीर लढाई ही त्या दृष्टीनं चालत राहील. शरद पवार म्हणतायेत किंवा इतर नेते म्हणतायेत की, नक्कीच मध्यावधी निवडणुकांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबर सुद्धा निवडणुका होऊ शकतात," असं संजय राऊत म्हणाले. दिल्लीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
"शरद पवारांशी मी सहमत. महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकीच्या दिशेनं जातंय," असंही राऊत म्हणाले.
 
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
 
मूळ पक्ष शिवसेना आहे. आपण शिवसेना पक्षाच्या चिन्हावर लढून आलात. शिवसेनेनं तुमच्या जिंकण्यासाठी शर्थ केली. तुम्ही शिवसेना सोडून गेलात.
आम्ही कायदेशीर लढाई लढू. ती लढावीच लागेल. सुप्रीम कोर्टात 11 जुलैला महत्त्वाची सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टात यासंबंधी याचिका प्रलंबित असताना, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणंच बेकायदेशीर आहे.
शिवसेना म्हणजे युक्रेन नाहीय. कोणताही गट शिवसेनेत ताब्यात घेऊ शकत नाही. महाराष्ट्रात शिवसेना तीच आहे. शिवसेना कमजोर झाली, असं म्हणणं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. राज्याची जनता बाळासाहेबांचा अपमान-अवमान सहन करणार नाही. आमच्या विधिमंडळ पक्षात नक्कीच फूट पडलीय. अशा अनेक प्रसंगातून आम्ही यापूर्वी गेलोय. हा पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो. पण आम्ही त्यातून उभे राहतो.
महाराष्ट्र तोडण्याचे त्यांचे इरादे पूर्ण होणार नाहीत. भाजपने म्हटलं की महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यात एक तुकडा मुंबईचा आहे. पण शिवसेना असेपर्यंत असे होणार नाही. मुंबईच्या धनसंपत्तीवर त्यांना ताबा हवाय, त्यासाठी मुंबई हवीय.
शिवसैनिक रस्त्यावर येतील आणि लढा देतील.
बंडखोर आमदारांच्या कानशिलावर वेगवेगळी शस्त्र लावली होती. मुंबईत सैन्य उतरवलं होतं. इतक्या सुरक्षेत का फिरावं लागतंय? आणि मग ते लोकप्रतिनिधी कसे?
महाराष्ट्रातलं आताचं सरकार म्हणजे भाजपनं केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला शिवसेना फोडायची होती, ते त्यांनी करून दाखवलं.
आम्ही सुद्धा तयारीला लागलोय. कायदेशीर लढाई ही त्या दृष्टीनं चालत राहील. शरद पवार म्हणतायेत किंवा इतर नेते म्हणतायेत की, नक्कीच मध्यावधी निवडणुकांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबर सुद्धा निवडणुका होऊ शकतात.
14 किंवा आणखी खासदार असतील. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना खरी. खरी किंवा खोटी हा प्रश्नही नाही. जिथं ठाकरे, तिथं शिवसेना.
शरद पवारांशी मी सहमत. महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकीच्या दिशेनं जातंय.
हे सरकार चालेल असं भाजपला खात्री असती, तर त्यांचा मुख्यमंत्री झाला असता.
शिवसेना संपवण्यासाठी 2019 साली आम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं नाही. ते दिलं नाही, कारण शिवसेनेला तोडायचं होतं.
 
शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी, नार्वेकरांनी झिरवळांचा 'तो' निर्णय फिरवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आता बहुमत चाचणीचं आव्हान आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी 7 आमदार अनुपस्थित होते. यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचंही नाव होतं.
 
रविवारी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांच्या निवडीने शिंदे सरकारने पहिली मोहीम फत्ते केली आहे. पण शिवसेनेने पक्षाचा व्हिप मोडल्याप्रकरणी 39 आमदारांसंदर्भात नव्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे.
 
यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर रविवारी सर्व आमदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे बहुमत चाचणीमध्ये देखील सरकार नक्की यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार दीपक केसरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना-भाजप युतीचे तसेच सहयोगी पक्षांचे आमदार उपस्थित होते.
 
शिंदे सरकार आकडेवारी
 
शिंदे समर्थक आमदार 39
 
भाजप आणि अपक्ष 113
 
इतर अपक्ष आमदार 11
 
बहुजन विकास आघाडी 3
 
मनसे 1
 
शेकाप 1
 
= 168
 
महाविकास आघाडी
शिवसेना - 16
 
काँग्रेस - 44
 
राष्ट्रवादी काँग्रेस - 51
 
माकप 1
 
एकूण = 112
 
शिंदेंच्या गटनेतेपदाला मान्यता
विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटानं दिलेलं पत्र मान्य करत एकनाथ शिंदे यांचं शिवसेना विधिमंडळ गटनेतेपद तर भरत गोवावले याचं प्रतोदपद मान्य केलं आहे. यासंदर्भात 22 जून 2022 रोजी अध्यक्षांना देण्यात आलेलं पत्र अध्यक्षांनी मान्य केलं आहे.
 
कायदेशीरबाबींचा अभ्यास करून आधी नरहरी झिरवळ यांनी नटनेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी सुनील प्रभू यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याच महाराष्ट्र विधानमंडळानं जाहीर केलं आहे.
 
परिणामी आता 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.