आमदार संतोष बांगर एकनाथ शिंदे गटात सामील
शिवसेनेचा अधिकृत गटनेता म्हणून एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिल्यानंतर ठाकरेंसोबत असणारे आमदार संतोष बांगर आज एकनाथ शिंदे गटात जाऊन मिळाले आहेत. ते आज सकाळी विधानभवनात जाताना बंडखोर आमदारांच्या बसमध्ये चढताना दिसले. त्यामुळे शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे ४० आमदार झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ३९ आमदार होते. या आमदारांनी काल भाजप उमेदवार राहूल नार्वेकर यांना मत देऊन विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केल्यानंतरही शिंदे गटातील आमदारांनी भाजप उमेदवाराला मत दिले. त्यानंतर उशिराने शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरत गोगावले आणि गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विधिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदे गटासोबत आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतरही ठाकरे गटातील आमदार शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे ठाकरे गट आता धोक्यात आला आहे. दरम्यान, सकाळीच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.