सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (10:45 IST)

'एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद भाजपमुळेच गेले,' संजय राऊत यांचा सामनातून गौप्यस्फोट

sanjay raut
"शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटत आहे", असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  म्हटलं आहे.
 
राऊत लिहितात, "एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचं अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटना ठाम असते. श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रिपद कोणी रोखले? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.
 
"शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व शिंदे करत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत," हे शिंदे यांनीच उघड केले.
 
"भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील 'ला मेरेडियन' हॉटेलात शिवसेना आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा फुटीर आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली," असं राऊत यांनी म्हटलंय.
 
"सुरतवरून हे बिऱ्हाड खास विमामाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था कारण काय?," असा सवाल संजय राऊत यांनी केला.