मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (08:58 IST)

लोडशेडिंगविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे ‘कंदील’आंदोलन...

राष्ट्रवादीच्य़ा महिलांनी, युवक संघटनेने महावितरण कार्यालयासमोर केली निदर्शने...
 
इंधनाची दरवाढ, महागाईने पिचलेल्या जनतेवर, राज्यावर दुष्काळाचे संकट आले असतानाही भारनियमन लादणाऱ्या निष्क्रीय सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यभरात आज तीव्र आंदोलन केले. 'अंधःकारात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असे फलक दर्शवत महावितरणच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तहसीलदार कार्यालयात भारनियमन रद्द करण्याबाबत निवेदनही देण्यात आले.
 
राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असतानाच आता वीजमहावितरण महामंडळाकडून लोडशेडिंग केले जात अाहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज ज्याठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे त्याठिकाणी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ठिकठिकाणी युवक संघटनेच्यावतीने निदर्शने करुन निषेध करण्यात आला. शिवाय महावितरण विभागाला निवेदनही देण्यात आले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आज राज्यात ज्या ज्याठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे त्या त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ  यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘कंदील’ आंदोलन करत सरकारला जागं करण्याचं काम केलं. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या गेटला कंदील अडकवून महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर युवक अध्यक्ष संग्राम कोते  यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ठिकठिकाणी वीजमहावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवाय आजपासून तीन दिवस युवक संघटनेच्यावतीने लोडशेडिंगविरोधात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संग्राम कोते पाटील यांनी दिली.
 
औरंगाबाद, सिंदखेडा, धुळे ग्रामीण, राहुरी, शेवगाव, चिखली, हिंगोली, सेलू, मानवत, पाथरी, बारामती, इंदापूर, दौंड. मावळ, सातारा, उमरेड, अमरावती, अकोले तसेच चंद्रपूर या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले.