सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (17:00 IST)

Environment Day: महाराष्ट्रात यावर्षी जंगलात 24 हजार वणवे लागले?

amazon forest
भारतभरात नोव्हेंबर ते जून 2021 या काळात जंगलात 3 लाख 45 हजार 989 लागल्याचं India State of Forest Report मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलंय. तर महाराष्ट्रात या वर्षी जंगलात 24 हजार 592 इतके वणवे लागले, असं राज्याची वनविभागाची आकडेवारी सांगते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या एकूण भूभागापैकी 24.62 टक्के जंगलं आहे. देशातील 8 कोटी 9 लाख हेक्टर्स जमीन जंगलाने आच्छादली आहे.
 
पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेय. तर यात आता जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होतंय.
 
जंगलातले वणवे कसे विझवतात?
चोवीस तास जंगलातील कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवून जंगलांचे आगीपासून रक्षण करणाऱ्या फायर वॉचरचे काम पाहण्यासाठी आम्ही नागपूर जिल्ह्यातल्या पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात गेलो. रविंद्र उईके फायरवॉचर म्हणून 24 तास सतर्क असतात.
 
ते म्हणाले, "जेव्हा जंगलात आग लागते तेव्हा आम्हाला मोबाईलवर मेसेज येतो. मॅसेज आल्यावर लगेचच आम्ही आमची ब्लोअर मशिनसारखी साधनं पाठीवर घेऊन बाईकने आग विझविण्यासाठी निघतो. जिथे आग लागली आहे तिथले आम्हाला तंतोतंत लोकेशन येतं. गुगल मॅपच्या मदतीने आम्ही त्या लोकेशनवर जातो. आग दिसल्यावर आम्ही ती आग ब्लोअर मशीनने विझवतो."
 
रविंद्र यांच्यासारख्या एका फायरवॉचरवर जवळपास सहाशे हेक्टरच्या जंगलाचं आगीपासून रक्षण करण्याची जबाबदारी असते.
 
"असंच एकदा मी घरी असताना टीव्ही पाहत होतो तेव्हा मोबाईलवर मेसेज आला. मोबाईलवर मेसेज आल्यानंतर मोबाईल पाहिला की आगीचे कोणते लोकेशन आहे. मग गुगल मॅपवर असं माहीत पडलं की 585 कंपार्टमेंट मध्ये आग लागली आहे. गुगल मॅपच्या आधारे मी ब्लोअर मशीन घेऊन त्या ठिकाणी पोहचलो. एक दीड हेक्टर मध्ये ती आग लागली होती. उशीर झाला असता तर आग आणखी जास्त पसरली असती. लवकर गेल्यामुळे जंगल वाचलं." फायरवॉचर रविंद्र उईके आपला अनुभव सांगत होते.
 
रस्ते, नागरिकीकरण आणि वृक्षतोडीने आधीच कमी झालेलं जंगल वणव्यांमुळे आणखी कमी होतंय.
 
नागपूरच्या गोरेवाडा जंगलाला 22 मे 2022 ला लागलेल्या आगीत 150 हेक्टर्स जंगल जळालं.
 
दुसऱ्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या निलगिरी लाकडाच्या वखारीत 30 हजार टन लाकडाची आगीत राख झाली. ही आग जंगलातील वणव्यामुळे लागली की या आगीमुळे जंगलाला आग लागली, याची चौकशी सध्या सुरू आहे.
 
राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आणि त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात या हंगामात सर्वाधिक वणवे लागत आहेत.
 
एकीकडे जंगलात प्रत्यक्ष फिल्डवर फायरवॉचर आग विझविण्यासाठी चौवीस तास तैनात असतात. तर नागपूर येथील वनविभागाच्या मुख्यालयात जंगलातील आगींचा रिअल टाइम डाटा मिळविण्यासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं.
 
"NASA च्या सॅटेलाईटवरुन ISRO च्या माध्यमातून माहिती फॉरेस्ट सर्वेला मिळत असते. या सॅटेलाईटमध्ये MODIS (Moderate Resolution Imaging Spectroradiometer) हे सेंसर आहे. जेव्हा या सॅटेलाईटचा भारतावरून प्रवास होतो, तेव्हा त्यांचा डाटा सेंस केला जातो. तो डेटा ISRO ला पाठवितात नंतर FSI ला पाठवितात. फॉरेस्ट सर्व्हे इंडियाच्या पोर्टलवरून वनविभाग हा डेटा घेतो. दिवसातून चार वेळा ही माहिती मिळते." वनविभागाचे कमांड आणि कंट्रोल सेंटरचे सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रताप साखरे माहिती देत होते.
 
वणव्यांवर नियंत्रण कसं आणतात ?
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशात 7 लाख चौरस किलोमीटर जंगल पसरलेलं आहे.
 
एवढ्या विस्तीर्ण भागातील जंगलाच्या कानाकोपऱ्यावर संबधित राज्याच्या वनखात्याकडून करडी नजर ठेवली जाते. जंगलात लागणाऱ्या आगी विझविण्याची जबाबदारी मुख्यत्वे वनविभागाच्या फायर वॉचरची आणि फॉरेस्ट गार्ड्सवर असते. पण या वनरक्षकांना आणि फायर वॉचरला रिअल टाईम माहिती आणि वनवणव्यांची नेमक्या जागेची माहिती देणे आवश्यक असते.
 
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार साधारणत: पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरपासून जूनपर्यंत देशभरात जंगलामध्ये वणवा लागण्याची घटना घडतात.
 
जंगलात लागणाऱ्या वणव्यांची माहिती मिळवण्यासाठी सॅटलाईटच्या माध्यमातून Real time data मिळवला जातो. "वनवणवा मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्वाचे महत्वाचं म्हणजे रिअल टाइम माहिती पाठवणं. जसा वणवा लागतो तसं सॅटेलाईटचे सेंसर ही माहिती जमा करतं. ही माहिती ग्राऊंड कंट्रोलला सेंटरला सॅटेलाईट ट्रान्समिट करतात. ही माहिती केंद्र सरकारच्या फॉरेस्ट सर्व्हेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वनविभागाच्या वेब पोर्टला प्रसिद्ध केली जाते.
 
ही माहिती पुढे वन विभागाच्या विभागवार असलेल्या नियंत्रण कक्षाला पाठविली जाते. याच वेळी ही माहिती विशिष्ट लोकेशनसह वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ट्रान्समिट करतात. यामुळे आमच्या वनकर्मचारी आणि वनरक्षकांना आग विझविण्यासाठी योग्य संसाधने घेऊन थेट त्याच भागात वेळेत जाता येते. अशा प्रकारे जंगलातील आग विझविली जाते.
 
"लोकेशन जीपीएस कोडने हे सर्व वेळेत आणि अचूकपणे होतं. ही सिस्टिम असल्यामुळे गेल्या काही वर्षात जंगलातील आगीच्या घटना वाढल्याचं दिसतंय. पण सर्व आगीच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर त्या विझवल्या जातात. शिवाय आग वेळीच नियंत्रित केल्याने जंगलाचे नुकसान वाचतं." असे राज्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याण कुमार सांगतात.
 
जंगलांना आग का लागते?
"महाराष्ट्रात कोरडी पानझडी जंगले dry deciduous forests आहेत. साधारणत: जानेवारी पासून राज्यात पानगळतीला सुरवात होते. जेव्हा राज्यात वनवणव्यांचा काळ येतो तेव्हा जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमास जमा झालेला असतो.
 
एकीकडे वन वणव्यांचा काळ, मोह फुले वेचण्याचा हंगाम आणि तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम एकाच वेळी येतात. मोह फुल वेचण्याच्या काळात आणि तेंदुपत्ता संकलनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत असतात. जंगलाला लागणाऱ्या 99 टक्के आगी मानवनिर्मित आहेत. वनविभागासमोर जंगलांना लागणाऱ्या आगींचे मोठे आव्हान आहे." असे राज्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याण कुमार सांगतात.
 
"जंगल हे जैवविविधतेचे नंदनवन असल्याने आगींचा यावर नकारात्मक परिणाम होतो. पण जंगलांना निसर्गाने दिलेली पुर्ननिर्माणाची क्षमता दिल्याने जेव्हा ऋतुचक्र बदलतं तेव्हा पुन्हा जैवविविधता निर्माण होते" असंही ते म्हणतात.
 
जंगलांना आग कोण लावतं ?
गेल्या काही वर्षात राज्यातील जंगलातील आगींच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीत अनेक गैरसमजुतीतून जंगलाला आगी लावल्या गेल्याचे वनाधिकारी पी. कल्याण कुमार सांगतात.
 
"वनवणव्यांच्या संदर्भात समाजातील अनेक घटकांमध्ये गैरसमज आहे. जंगलांना आग लागली तर तेंदूपत्याचे उत्पन्न वाढेल, तेंदुपत्ता संकलन जास्त होईल शिवाय तेंदूच्या पानांची गुणवत्ता वाढेल असा काही लोकांचा समज आहे. पण आपले संशोधनाने हे सिद्ध केले आहे की हे सर्व खोटे आहे."
 
"गावातील गुराखी सुद्धा गुरांसाठी चारा जास्त उगवेल या गैरसमजुतीतून गवताला आग लावतात. यामुळे जंगलात आगी पसरतात" असे वनवणव्यांसदर्भात संशोधन करणारे सातपुडा फाऊंडेशनचे मंदार पिंगळे सांगतात.
 
शिवाय शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ करण्याासाठी शेतकरी आपल्या शेतात आग लावत असतात. यामुळेही शेताजवळील जंगलात आग लागते.
 
पर्यावरणवाद्यांनी जंगलांना लागणाऱ्या आगी हा जगापुढील महत्वाचा विषय असल्याच सांगत यावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नियंत्रण मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
वणव्यांमुळे मानवी वस्त्या धोक्यात
जागतिक पर्यावरण बदलामुळे आधीच खराब झालेली पर्यावरणीय परिस्थिती जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे अधिकच बिकट होत चालली आहे असेही पर्यावरणवादी वेळोवेळी आठवण करून देत आहेत.
 
जंगल आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे. पण कार्बन डायऑक्साईडही वातावरणात वाढतो आहे. हा हरितगृह वायू आहे व त्याचा प्रतिकूल परिणाम पृथ्वीचे तापमान वाढीमध्ये दिसून येत असल्याचे संशोधनात पुढे आल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.
 
"ज्या वेळी जंगलामध्ये आगी लागतात तेव्हा लहान किटकांपासून ते मोठ्या वन्यप्राण्यांपर्यंत सर्वांच्या अधिवासावर त्याचा आघात होतो. या वन्यप्राण्यांना उपलब्ध असलेलं खाद्य हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहत नाही. आग लागल्यानंतर पाऊस पडल्यानंतर तिथल्या जंगलांच पूर्वीसारखं जीवन होत नाही.
 
त्यामुळे अन्नसाठा त्यांचा कमी झाल्यामुळे आणि त्यांचा तिथला अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर येतात आणि मानवी वस्तीकडे येताना दिसतात. या मुळे मानव आणि वन्यजीवन संघर्ष पाहायला मिळतो. " असे वनवणव्यांसदर्भात संशोधन करणारे सातपुडा फाऊंडेशनचे मंदार पिंगळे सांगतात.