शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (22:28 IST)

ओबीसी आरक्षणासाठी १२ काय १०६ आमदारांचे निलंबन झाले तरी संघर्ष करत राहू!

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज ओबीसी आरक्षणावरून सभागृहात आणि तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. यावेळी, धक्काबुक्की आणि शिविगाळ झाल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. या कारवाईवरून भाजपा आक्रमक झाली असून, कामकाजावर बहिष्कार घातल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले.
 
फडणवीस म्हणाले की, आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती सरकारने खरी केली. ओबीसी आरक्षणावरून सरकारला आम्ही उघडं पाडलं. आमच्या १२ आमदारांना खोटे आरोप करून निलंबित केले. मात्र मी एक स्पष्ट करू इच्छितो की, ओबीसी आरक्षणाकरिता १२ काय १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही संघर्ष करत राहू. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही एक वर्ष नाही तर पाचही वर्ष निलंबन झालं तरी पर्वा करत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका मांडली.
 
फडणवीस पुढे म्हणाले की, आधीही लोक मंचावर चढले होते. अनेकदा दालतान बाचाबाची होते, पण कुणी सस्पेंड होत नाही. आजसुद्धा असाच प्रकार घडला मात्र भाजपाच्या आमदाराने शिवी दिलेली नाही. आता माझ्यावर उद्या हक्कभंग आणला तरी चालेल. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, याबाबत स्टोरी तयार करण्यात आली. तिथे शिव्या कुणी दिल्या, हे सर्वांना पाहिलंय. शिवसेनेचे सदस्य तिथे आल्यानंतर वाद झाला. त्यानंतर आमचे सदस्यही आक्रमक झाले. मात्र आम्ही वाद वाढू दिला नाही. मी स्वत: अनेकांना रोखले. त्यानंतर आशिष शेलार यांनी सर्वांच्या वतीने तालिका अध्यक्षांची माफी मागितली. मग भास्कर जाधव यांनी आशिष शेलार, गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. मात्र नंतर सभागृहात तालिका अध्यक्षांनी आमच्या आमदारांचे निलंबन केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी तयार करण्यात आली
सरकारनं आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून १२ आमदारांचं निलंबन केलं आहे. एक वर्ष नाही पाचही वर्ष सदस्यपद रद्द झालं तरी पर्वा करत नाही. माझ्यावर हक्कभंग आणला तरी पर्वा नाही. इथे स्टोरी तयार करण्यात आली. एकाही भाजपच्या सदस्यानं शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांनी पाहिलं आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.