रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (14:34 IST)

आधारला मोबाईल व ई-मेल लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

नाशिक डाक विभागाने पोस्टमन, डाकसेवक यांच्या माध्यमातून विभागातील सर्व डाक कार्यालयात UIDAI च्या CELC ॲपद्वारे नागरिकांना आधाकार्डला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्यावत करण्याची विशेष मोहिम सुरू केली आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हा डाक विभागामार्फत माहिती अद्यावत करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती नाशिक डाकघर विभागाचे प्रवर अधिक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
विभागातील सर्व डाक कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, या सेवेमुळे नागरिकांना आधार कार्ड मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी लिंक करता येणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील सर्व नागरिकांनी तसेच मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी सर्व रहिवाशांसाठी तसेच मोठ्या आस्थापना किंवा कार्यालयांचे प्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस अद्यावत माहिती लिंक करण्याकरिता जवळच्या डाक कार्यालयाशी अथवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधवा, अशी माहिती शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक डाकघर विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही लोकाभिमुख बँक असुन प्रत्येक व्यक्ति पर्यंत शासनाचे लाभ पोस्टमनच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात घरपोच अदा केले आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारने भारतीय डाक विभागामार्फत सुरु केलेली बँकिंग सेवा असून, त्याद्वारे धन अंतरण (मनी ट्रांसफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस  या सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी जोडले असेल तर आधार सक्षम पेमेंट सिस्टम (Aeps) सेवेद्वारे कोणत्याही बँकचे पैसे पोस्टमन, डाक सेवक किंवा आपल्या जवळ असलेल्या पोस्ट ऑफिस मधून काढु शकतात. अशा विविध सुविधा
या बँकेतर्फे देण्यात येत असल्याची माहितीही प्रवर डाक अधिक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
अधिक माहितीसाठी आयपीपीबीच्या www.ippbonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच जवळच्या डाक कार्यालयात अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा, असेही प्रवर अधिक्षक श्री. अहिरराव यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.