शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (22:12 IST)

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ‘प्रकाशगड’ची अतिरिक्त कुमक

तोक्ते चक्रीवादळामुळे  सिंधुदुर्ग  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रकाशगड मुख्यालयातून अतिरिक्त मनुष्यबळ पाठविण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली.
 
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्वप्रथम प्रवेश करून फार मोठा हादरा दिला आहे. या वेळी जिल्ह्यातील डोंगर, खाड्या आणि प्रचंड झाडी यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वारा आणि पाऊस यामुळे महावितरण कंपनीच्या वीज पुरवठा यंत्रणेची वाताहत झाली, यामध्ये 31 उपकेंद्रे तसेच शंभर पेक्षा जास्त फिडर बंद पडल्याने पूर्ण जिल्ह्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे.
 
या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांचे स्थानिक ठेकेदार यांच्यासोबत रात्रंदिवस अथक प्रयत्न सुरू आहेत. परंतु झालेल्या हानीचा विचार करून जिल्ह्यात बारामती, सातारा आणि कोल्हापूर येथील 21 ठेकेदार संस्थांचे सुमारे 250 प्रशिक्षित कामगार, याशिवाय कल्याण, कोल्हापूर, भांडुप, बारामती, सांगली येथील नियमित 468 जनमित्र आणि 87 अभियंत्यांची टीम दि. 19 मे रोजी हजर झाली असून ते विविध ठिकाणी स्थानिक 234 जनमित्रांसोबत जोमाने कार्यरत झाले आहेत. याचवेळी जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या या अधिकारी व कामगारांसाठी सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीचा विचार करून आवश्यक दक्षता घेतली जात आहे.  केवळ कोरोना विषयक दक्षता घेण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.