शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (22:44 IST)

फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना पवारांना धमकी आलेल्या ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश

devendra fadnavis
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा,” असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला आहे. शरद पवार यांना धमकी आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. जवळपास पाऊण तासाची ही भेट होती.
 
दरम्यान शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, असं फडणवीस म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजकारण महाराष्ट्राचे असं या ट्विटर हँडलचं नाव आहे.’तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी धमकी शरद पवार यांना देण्यात आली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.
 
शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच शरद पवारांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
 
दम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘राजकारण महाराष्ट्राचे’ असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य पाहून लगेचच मोठा पोलीस फाटा त्यांच्या घराबाहेर आणि मोदी बाग परिसरात तैनात करण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor