1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (15:00 IST)

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कारमधील “इतक्या” जणांचा जागीच मृत्यू

Horrific accident involving car and luxury bus on Ahmedabad National Highway
मुंबई : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एका महिलेसह ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यामधील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारची लग्झरी बसला जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर बसमधील तीन प्रवासी अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.
 
मोहम्मद अब्दुल सलाम हाफिसजी (वय ३६वर्ष), आसिया बेन कलेक्टर (वय ५७ वर्ष), इब्राहिम दाऊद (वय ६० वर्ष) इस्माईल महंमद देसाय (वय ४२ वर्ष) अशी अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. तर लग्झरीमधील तीन प्रवाशांना अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात कासा पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मीजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मृतांमध्ये ३ पुरुष आणि १ महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor