सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (12:01 IST)

जन्मदात्या पित्यानेच घेतला चिमुकल्याचा बळी, भिंतीवर आपटलं, गळा दाबून जीव घेतला

शाहुवाडी तालुक्यातील आरव केसरे या सहा वर्षीय बालकाच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच चिमुकल्याचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले. याआधी त्याच्या शरीरावर गुलाल, हळदी, कुंकु टाकल्याने नरबळीचा संशय घेतला जात होता पण प्रकरण वेगळचं असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
नेमकं काय घडलं?
राकेश रंगराव केसरे हा एका हॉटेलमध्ये काम करतो. रविवारी सायंकाळी हॉटेलवर कामाला जाण्याआधी आरोपीला चहा पिण्याची तलप लागली होती. त्यामुळे आरोपीनं आपला मुलगा आरवला घराबाहेर गेलेल्या पत्नीला बोलावून आणण्यास सांगितलं. पण चिमुकल्यानं वडिलांचं काम करण्यास नकार दिला.
 
मुलानं काम करण्यास नकार दिल्यानं आरोपीनं रागाच्या भरात आरवला भिंतीवर जोरात आपटलं. यावरही राग शांत झाला नाही तर आरोपीने आपल्या मुलाच्या छातीस जोरदार ठोसा मारला. हा ठोसा इतका भयंकर होता, की यामध्ये चिमुकल्याच्या छातीच्या दोन बरगड्या तुटल्या अन् तो जागीच बेशुद्ध झाला. यानंतर आरोपीनं मुलाचा गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर घरामागील पडक्या खोलीत मृतदेह लपवून ठेवला.

 
नंतर हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपीनं आरव बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. फिर्याद दाखल करुन राकेश निमूटपणे सरूड येथील हॉटेलवर कामासाठी निघून गेला. दरम्यान आरवचा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. आरोपीनं आरवच्या मृतदेहावर हळद कुंकू टाकून संबंधित प्रकार नरबळीचा असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पण याप्रकरणी पोलिसांनी गावातील आरोपीचे नातलग आणि अन्य स्थानिक नागरिकांशी चौकशी केली असता हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.