शिर्डी विमानतळ रविवारपासून सुरू होणार
कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले काकडी येथील शिर्डी विमानतळ रविवार (दि. १०)पासून सुरू होणार आहे. त्यास शिर्डी विमानतळाचे संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी दुजोरा दिला.
मंदिरेही भाविकांसाठी खुली होणार असल्याने विमानसेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यादृष्टीने विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाची विमाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पाईसजेट व इंडिगो एअरलाईन्स सुरुवातीला दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई याठिकाणची विमानसेवा सुरू करणार आहे. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता दिल्लीहून शिर्डी विमानतळावर पहिले विमान दाखल होईल. तर हेच विमान दुपारी १२.३० वाजता दिल्लीला रवाना होईल. दुपारी २.३० वा. हैद्राबादहून शिर्डी विमानतळावर विमान उतरेल तर पुन्हा दुपारी ३ वाजता हैद्राबादला रवाना होईल.
दुपारी ४ वाजता चेन्नईहून शिर्डी विमानतळावर विमान दाखल होईल. दुपारी ४.३० वाजता पुन्हा चेन्नईकडे रवाना होईल. विमान प्रवासासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. 18 महिन्यांनंतर विमानसेवा सुरू होत असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.