बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:04 IST)

भाजपमुळे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांच्यामध्ये फोनवर मतभेद होऊन शाब्दिक बाचाबाची झाल्याच्या जोरदार चर्चा सध्या रंगल्या आहेत. ओवळा माजिवाडा मतदारसंघावरुन या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे बोलले जात आहे. हा मतदारसंघ भाजपाला देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्नशील आहेत. मात्र सरनाईक यांना ते मान्य नसल्याने हा वाद सुरु असल्याच्या चर्चा आहेत.
 
ठाणे येथील ओवळा माजिवाडा हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून, प्रताप सरनाईक या मतदारसंघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडावा यासाठी शिंदेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्याला सरनाईकांनी विरोध केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि सरनाईक यांच्या सध्या संघर्ष सुरु आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नगरविकास खात्याच्या एका कार्यक्रमातदेखील व्यासपीठावर सरनाईक उपस्थित नव्हते. या सगळ्या बाबींविषयी नेमकी वस्तूस्थिती काय, असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला.  विशेष म्हणजे यावेळी प्रताप सरनाईकही उपस्थित होते. यावर एकनाथ शिंदे यांनी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया देत सविस्तर बोलणं टाळलं. “आम्ही दोघेही तुमच्यासमोर आहोत. आम्ही काम करणारी लोकं आहोत,” असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.
 
दो दिल और एक जान है हम..
प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी एक सूचक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार सरनाईक यांचे एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना “दो दिल और एक जान है हम” असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे. या सूचक ट्विटमधून मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक यांच्यात सर्वकाही ओके असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor