शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (07:58 IST)

आर्थिक राजधानी कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर १ टक्क्यांवर आला, मनपाच्या उपाययोजनांमुळे आता नियंत्रणात

आर्थिक राजधानी मुंबईतील कोविडची तिसरी लाट पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता नियंत्रणात आली आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील कोविड पॉझिटिव्हिटीचा दर १ टक्केपर्यंत वाढला होता. मात्र आता ५६ दिवसांनंतर पॉझिटिव्हिटीचा दर पुन्हा १ टक्क्यांवर आला आहे.  समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे, असे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी म्हटले आहे.
 
मुंबईत मार्च २०२० रोजी कोविड संसर्गाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काही गाफील लोकांमुळे मुंबईत कोविडचा संसर्ग वाढून कोविडची पहिली व दुसरी लाट आली होती. मात्र पालिकेने विविध उपाययोजना करून त्यावर नियंत्रण मिळविले होते. मात्र पुन्हा एकदा काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे डिसेंबर २०२१ ला पुन्हा एकदा कोविडचा संसर्ग वाढून तिसरी लाट आली.
 
या तिसऱ्या लाटेमुळे मुंबईत कोविडचे २ लाख ८५ हजार रुग्ण आढळून आले होते. या तिसर्‍या लाटेच्या ५६ दिवसांत कोविडमुळे ३१२ रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज सरासरी ५.५ मृत्यू झाले. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही तुलनात्मक शहरासाठी तिसऱ्या लहरीतील हा सर्वात कमी एक अंकी मृत्यूदर आहे. ही आपल्या सर्वांसाठी खूप समाधानाची आणि अभिमानाची बाब असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
 
मुंबईत कोविडला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरण मोहीम सुरू झाली. एका वर्षात मुंबईतील ११४ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ९५ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.