बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (09:18 IST)

शिक्षणमंत्री कोचिंग क्लासेसकडून देवाणघेवाण करतात माजी मंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

सूरतमध्ये कोचिंग क्लासमध्ये झालेल्या अग्नीतांडवात २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीलर आलाय. महाराष्ट्रात आज जवळपास १ लाख ते १ लाख १० हजार कोचिंग क्लासेस आहेत. मुंबईतील ३०-४० हजार क्लासेसमध्ये फायर ऑडिट व्हायला हवे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, बेसमेंटमध्ये क्लास भरवले जातात, असा क्लासेस वर निर्बंध घातले गेले पाहिजेत, असे मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. याबाबत कायदा केला जाणार होता, मात्र तो अद्यापही झालेला नाही. २०१७ मध्ये यासंदर्भात समिती गठीत केली होती. १२ सदस्यांच्या तज्ज्ञ समितीने अहवाल सादर केला. कायद्याचा मसुदा तयार आहे, मात्र हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे या गंभीर प्रश्नाबाबत लक्ष का घालत नाहीत? असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला. शिक्षणमंत्र्यांची कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांकडून देवाणघेवाण झाली आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय. तावडे याबाबत लक्ष घालणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, पण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको, अशी मागणीही देशमुख यांनी केली.
 
यावेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण उपस्थित होते.