रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (11:31 IST)

भारतातील पहिली खासगी ट्रेन शिर्डीत दाखल, 830 प्रवाशांसह कोईम्बतूरमधून साईनगरीत

private train in India
भारत गौरव योजने अंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशनवर पोहचली. मंगळवारी कोईम्बतूर येथून या साऊथ स्टार रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. 830 प्रवासी घेवून सकाळी निर्धारित वेळेच्या एक तास आधीच ही रेल्वे शिर्डीत दाखल झाली आहे. या रेल्वेने आलेल्या प्रवाशांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
 
या स्पेशल ट्रेनमध्ये 1500 लोक प्रवास करू शकतात. न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सेवा पुरवठादाराने कोचच्या जागांचे नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन सहली केल्या जातील. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 डबे आहेत.
 
 
अधिकृत प्रसिद्धीनुसार, या ट्रेनचे भाडे भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणार्‍या नियमित रेल्वे तिकीट दरांच्या बरोबरीचे आहे आणि शिर्डी साईबाबा मंदिरात विशेष व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केली जाईल. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सेवा प्रदात्यांद्वारे केली जाईल, जे संपूर्ण प्रवासादरम्यान कधीतरी साफसफाई करतील. तसेच ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
 
भारत गौरव साऊथ स्टार ही रेल्वे कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली होती. तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी असे थांबे पार करुन तिला सकाळी 7:30 वाजता साईनगर रेल्वे स्थानकावर पोहचणे निर्धारित केले होते. मात्र ही फुलांनी सजवलेली रेल्वे सकाळी वेळेच्या आधीच एक तास साईनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पोहचली. यातून 830 प्रवासी शिर्डीत दाखल झाले आहेत.
 
रिपोर्टनुसार, या ट्रेनमधील स्लीपरना नॉन एसीसाठी 2500 रुपये, थर्ड एसीसाठी 5000 रुपये, सेकंड एसीसाठी 7000 रुपये आणि फर्स्ट एसीसाठी 10000 रुपये मोजावे लागतील.