नकली सोने गहाण ठेवून जिल्हा बँकेची फसवणूक
मिरज तालुक्यातील नरवाड येथे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत नकली सोने गहाण ठेवून तिघांनी संगनमत करुन बँकेची एक लाख, 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँक अधिकारी एजाज अहमद अजिमुद्दीन बागसिराज (वय 47) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यलगोंडा भीमराव कोरवी, मल्हारी परसू कांबळे आणि सराफ व्हॅल्यूअर महादेव आण्णाप्पा भेंडवडे (तिघे रा. नरवाड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एजाजअहमद बागसिराज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यलगोंडा भीमराव कोरवी आणि मल्हारी परसू कांबळे हे दोघे जिल्हा मध्यवर्ती बँक नरवाड शाखेतील खातेधारक आहेत. यलगोंडा कोरवी यांनी 7 एप्रिल 2022 रोजी कर्ज खाते (क्र. 633) मध्ये 20.700 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या गहाण ठेवून 63 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तर मल्हारी परसू कांबळे यांनी 20 एप्रिल 2022 रोजी कर्ज खाते (क्र. 639) मध्ये 44.600 ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक नग गंठण गहाण ठेवून एक लाख, 26 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. बँकेकडून कर्ज घेण्यापूर्वी सराफ व्हॅल्यूलर महादेव आण्णाप्पा भेंडवडे यांनी दागिन्यांचा व्हॅल्यूएशन रिपोर्ट दिला होता.
मात्र, त्यानंतर कर्ज फेडीची प्रक्रिया सुरू झाली असता तारण गहाण ठेवलेले दागिने नकली असल्याचे आढळून आले. विभागीय अधिकारी रावसाहेब पाटील, हेड ऑफिसचे संजय पाटील या अधिकाऱ्यानी पुन्हा दागिन्यांची व्हॅल्यूलर तपासणी केली असता त्यामध्ये दागिने नकली असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर बँक अधिकारी एजाज अहमद बागसिराज यांनी मिरज ग्रामीण पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार खातेदार यलगोंडा भीमराव कोरवी, मल्हारी परसू कांबळे आणि सराफ व्हॅल्यूअर महादेव आण्णाप्पा भेंडवडे (तिघे रा. नरवाड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.