बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुक्तच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध करून देणार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांची पुरात गहाळ झालेली अथवा खराब झालेली शैक्षणिक कागदपत्रे विद्यापीठामार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी जाहीर केला. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक शहरात मुसळधार पावसामुळे महापुरापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण झाली. या भागातील सर्व प्रमुख शहरे व हजारो गावे पाण्याखाली गेली. घरादारासोबत शेती, पीकपाणी व जनावरे यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचा फटका लाखो लोकांना बसला आहे. त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक कागदपत्रांचे नुकसान झाले आहे. घरातील इतर साहित्यासोबत विविध मूळ शैक्षणिक गुणपत्रके, प्रमाणपत्रके एकतर पुरपाण्यासोबत वाहून गेली आहेत किंवा सतत आठवडाभर पाण्यात भिजून खराब झालेली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक वाटचालीत व भावी कारकीर्दमध्ये मोठ्या अडचणी वा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राज्यातील आपल्या पूरग्रस्त विद्यार्थ्याच्या मदतीसाठी त्वरीत पाऊल उचलले आहे.त्यानुसार राज्यातील पूरबाधित प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पूरबाधित विद्यार्थ्यांना त्यांची मूळ व महत्वाची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे – कागदपत्रे कोणतेही शुल्क न आकारता थेट त्यांना पाठविली जातील. 
 
चौकट – १ 
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही शैक्षणिक अडचण येवू नये यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कागदपत्रांच्या बदल्यात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 
-प्रा. ई. वायुनंदन. कुलगुरू  
 
चौकट – २ 
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे पूरग्रस्त विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित विद्यार्थ्यांनी तो भरून नवीन कागदपत्रांसाठी विद्यापीठाकडे अर्ज केल्यास त्यांना त्वरीत नवीन गुणपत्रक, प्रमाणपत्रक आदी शैक्षणिक कागदपत्रके त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर विनाशुल्क पाठविण्यात येतील.  
-डॉ. अर्जुन घाटुळे, मुख्य परीक्षा नियंत्रक.