1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (20:57 IST)

भुजबळांच्या पाठपुराव्यानंतर येवल्यातील स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकाला गती

Freedom fighter Tatya Tope
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून स्वा.सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास राज्य शासनाचा १ कोटी ५७ लक्ष रुपयांचा हिस्सा वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे रखडलेल्या या कामाला आता अधिक गती मिळणार आहे.
 
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पहील्या संग्रामातील तात्या टोपे हे एक प्रमुख सेनानी होते. त्यांच्या अतुलनिय त्यागाने व शौर्याने भारतीय स्वांतत्र्याच्या इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय लिहिला गेलेला आहे. त्यांचा हा इतिहास स्मरणात राहावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीमधून येवला येथे त्यांचे स्मारक विकसित करण्यात येत आहे. या स्मारकाचे काम निधी अभावी बंद पडले होते. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
 
 स्वा.सेनानी तात्या टोपेंच्या मुळ गावी म्हणजे येवला येथे नगर परीषदेच्या मालकीच्या स. न. ४९ व ५० बाभुळगाव खु.येथे त्यांचे स्मारक उभारण्याच्या सुमारे १०.५० कोटी रकमेच्या कामास केंद्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. यासाठी केंद्र शासन ७५ टक्के, राज्य शासन १५ टक्के व नगर परिषद १० टक्के निधि उपलब्ध करुन देणार असल्याचे निश्चित झालेले आहे. यानुसार केंद्र शासनाने त्यांच्या हिश्श्याच्या ७.८८ कोटी पैकी ३.९४ कोटी म्हणजे अर्धा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून उपलब्ध निधी पैकी रक्कम रु. ३.९२ कोटी या कामासाठी खर्च करण्यात आलेले असून उर्वरीत कामासाठी निधीची आवश्यकता होती. त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा रक्कम रु. १.५७ वितरीत करण्यासाठी शासन निर्णय प्रख्यापित करण्यात आलेला असून निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
 
 स्वा.सेनानी तात्या टोपे यांच्या या स्मारकात स्मृती उद्यान बांधण्यात येणार आहे. सदर उद्यानात माहिती केंद्र, शिल्पकृती, गॅलरी, प्रदर्शन हॉल, वाचनालय, ऑडिओ व्हिज्युअल हॉल, प्रतिकात्मक शिल्प गार्डन, लेझर शो, कॅफेटेरिया, बगीचा, चिल्ड्रन पार्क, पार्किंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor