नथुरामची स्तुती करणारे मुलाचे नाव नथुराम का ठेवत नाहीत?
'महात्मा गांधीजींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसे याची आज खुलेआम स्तुती केली जात आहे, मात्र जे लोक नथुरामची स्तुती करतात त्यांच्यापैकी एकालाही आपल्या मुलाचे नाव नथुराम ठेवावे वाटत नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या मनात सत्याबद्दल, वास्तवाबद्दल थोडी तरी चाड शिल्लक आहे आणि जोपर्यंत त्यांच्या मनात सत्य आणि वास्तवाची ही सामाजिक जाणीव शिल्लक राहिल तो पर्यंत महात्मा गांधीजींसारखे शाश्वत मूल्य देणारे व्यक्तीमत्व मरणार नाही, 'असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी मांडले. निमित्त होते कुसुमाग्रज स्मारकात आयोजित गांधी उत्सव कार्यक्रमातील 'गांधी : काल, आज आणि उद्या' या विषयावरील व्याख्यानाचे.
दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर 1915 साली भारत समजून घेण्यासाठी पुढील एक वर्ष महात्मा गांधीजींनी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास केला. या घटनेला 100 वर्षे झाल्यानंतर 2016 साली निरंजन टकले यांनी गांधीजींनी प्रवास केलेल्या त्याच मार्गाने पुन्हा सामान्य वर्गातून रेल्वेने प्रवास करत आजच्या काळातील गांधी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रवासातील अनुभव आणि त्यावर आधारित गांधी चिंतन त्यांनी आपल्या व्याख्यानातून श्रोत्यांसमोर ठेवले. या प्रवासादरम्यान मुघलसराय स्टेशनवर त्यांना काही मजूरी करून शिकणारी तरूण मुले भेटली. त्यांनीच महात्मा गांधीजींबद्दल उपरोक्त तत्वज्ञान आपल्याला सांगितल्याचे श्री. टकले यांनी सांगितले.
ज्यांना गांधीजींचे विचार पटतात आणि ज्यांना ते पटत नाहीत अशा दोघांचेही विश्व महात्मा गांधींनी व्यापले असल्याचे सांगून ते म्हणाले की गांधींबद्दलचा द्वेष हा त्यांच्या विरोधकांमधील भय आणि न्यूनगंड यातून आलेला आहे. गांधीविचाराला हरविता येत नाही या भयाच्या भावनेतून आजही काही जण त्यांना विरोध करत आहेत. मात्र प्रत्येक सत्तेचा, वाईट विचारांचा सूर्य कधी तरी मावळत असतो आणि जेव्हा तो मावळेल, तेव्हा सामान्यांना लक्षात येईल की गांधींजींच्या विचारांचा प्रकाश आजही कायम आहे, शाश्वत आहे. जगात शाश्वत काय आहे, सत्य काय आहे ते गांधीजी सांगतात. असेही टकले यांनी स्पष्ट केले.