बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By वेबदुनिया|

गांधीवाद आजही प्रासंगिकच

हिंसा कोणत्याही प्रकारची असो. ती दु:ख पोहचवते व मोठ्या प्रमाणात मनस्तापाला खतपाणीही घालत असते. आज प्रमाणे सर्वत्र हिंसा पसरली आहे. ती खूपच धोकादायक आहे. सामजिक हिंसेचे बीज समाजात जागोजागी जाणून बुजून पेरले जात आहे. सामाजिक हिंसेच्या जखमा समाज मनावर अनंत काळ घर करून राहतात. अशा परिस्थितीत समाजाच्या विकासासाठी जवळ-जवळ सर्वच प्रश्न मागे पडतात व दहशतवादाच्या जात्यात सामान्य जनता भरडली जाते. समाजिकतेच्‍या आगीवर राजकारणी पोळी भाजून घेत आहेत. त्यांचा हा खेळ पाहून दु:ख होते व महात्मा गांधींचे स्मरण होते. 

समाजात हिंसा पसरवण्याचे दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील पहिले व मुख्य म्हणजे श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी अधिक वृंदावत आहे. त्यामुळे सामजिक ऐक्य धोक्यात आले आहे. एका बाजुला भारत सुपर पॉवर होण्याचा तसेच विकासात आघाडी घेतल्याचा दावा करत आहे. तर दुसर्‍या बाजूला देशातील मोठा हिस्सा साधनसामग्रीच्या अभावामुळे जीव वाचवण्याची धडपड करत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब जनतेकडे पाहण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही. विकासाच्या योजना आखणार्‍यांकडून ग्रामीण भागातील गरिबांना डावलले जात आहे.

हिंसा वाढण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार. तो तर समाजाच्या रक्तातच ठाण मांडून बसला आहे. शासनाच्या तुटपुंज्या कल्याणकारी योजना ग्रामीण भारतापर्यंत पोहचण्याआधीच भ्रष्‍टाचार त्यांना गिळंकृत करतो. भ्रष्‍टाचाराशी दोन हात करण्यासाठी समाजातील दोन-चार मिळून स्थापन केल्या सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र राजकारण्यांकडून त्यांचीही गळचेपी होताना दिसते. त्‍यामुळे तेही हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत उणीव भासते ती गांधीवादी विचारसरणीची.

गांधीवादी कल्पनेच्या उलट सत्तेचे केंद्रीकरण होत चालले आहे. महात्मा गांधीजींच्या मते या सत्तेचे मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण झाले पाहिजे. या सत्तेचे सामान्य नागरिकालाही स्थान मिळाले पाहिजे. आज संपूर्ण योजनांची सुत्रे ही मुंबई व दिल्ली येथून फिरवली जातात. अलिशान व एअरकंडीशन ऑफिसात बसून अधिकारी ग्रामीण भारताचे मुल्यमापन करतात. आराम खुर्चीवर बसुन त्यांना कागदावरचा चकाकणारा भारत व विकास कामेच दिसणार ना! समाजात हिंसाला व जनतेत शासनाप्रती असंतोष पसरवण्याला या दोन बाबी कारणीभूत आहेत. खेदाची गोष्ट म्हणजे जनतेतील असंतोषाची जागा आता हिंसेने घेतली  आहे.
 
-प्रकाश आमटे
PR
PR
देशाच्या कान्‍या-कोपर्‍यात शेतकरीवर्गातील असंतोषाचा स्फोट होऊन ते पेटून उठले असून त्यांनी व्यवस्थापनाविरूध्द आंदोलन छेडले आहे. त्यांचा आज कुणी वाली राहिलेला नाही. विकासाच्या नावाखाली त्यांना मरण यातना देण्याचे सत्र चालविले जात आहे. उद्योगपती नाही, पुढारी नाही तरी जगाचा पोशिंदा समजल्या जाणार्‍या शेतकरी व आदिवासींना आपल्या जमिनींचा त्याग करावा लागत आहे, ही स्वतंत्र भारतासाठी किती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

देशाच्या जनतेत आंदोलनांची जोरदार चर्चा होते. आणि अन्यायाविरूध्द ते झालेही पाहिजे. मात्र दु:खी जनता चुकीच्या पध्दतीने आंदोलन करत आहे. चुकीच्या मार्गाने चाललेले पाऊल हिंसाचाराकडे वळत आहे. हिंसेकडे जाणारी लाखो पावले आपण थांबवली पाहिजे. मात्र ही पावले थांबण्याची ताकद कुणामध्येही नाही. त्यातून एकच मार्ग निघू शकतो तर तो म्हणजे गांधीवाद...

राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीवर विकासकामांची लहान मोठी मॉडेल तयार केली जात आहे. केले जाणारे प्रयोग आज लहान ‍दिसत असले तरी भविष्यात मोठे स्‍वरूप धारण करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. अशाच प्रकारचा लहान प्रयोग महाराष्ट्राच्या अति मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 1974 मध्ये करण्यात आला होता. या जिल्ह्यातील भामरगड परिसरातील आदीम आदीवासी माडिया आणि गोंड हा समाज साक्षरतेअभावी भ्रष्ट अधिकार्‍यांच्या शोषणाचे शिकार झाले होते. त्यांना कोणते अधिकार आहेत ते देखील त्यांना माहीत नव्हते. आम्ही त्यांचा विश्वास जिंकून त्यांना न्याय देण्याचे प्रयत्‍न सुरू केले. हा गांधीवादी विचारसरणीचा मार्ग आम्हाला आमचे बाबा, बाबा आमटे यांनी दाखवला. अहिंसक मार्गाने आम्ही त्या भ्रष्ट अधिकार्‍यांना चांगलीच अद्दल घडवली.

त्या आदिवासी समाजाला या गांधीवादी विचारसरणीतून नवीन दृष्टी, नवीन दिशा मिळाली. ज्‍या मातीत त्यांनी जन्म घेतला त्या मातीच्या संस्कृतीशी त्यांचे नाते जोडले गेले. तेथे शाळा सुरू झाल्या, परिसराचा सर्वागिण विकास झाला. त्यांच्या या आनंदाची कुणाशीच तुलना केली जाऊ शकत नाही.

याच अनुभवाच्या आधारावर वाटते की, आज गांधीवादी विचार, गांधीवादी संस्कृतीची प्रासंगिकता आधीच्या तुलनेत कित्येंक पटीने वाढली आहे. त्याच्या प्रचार आणि प्रसाराची वेळ आता आली आहे. नवीन पिढीला त्याच्याबाबत आपण अधिक माहिती दिली पाहिजे. उपभोगवादी संस्कृती चांगलीच फोफावली असून त्यामुळे देशवासियांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर आज एकमेव उपाय आहे तो गांधीवादाचा...
(लेखक ज्‍येष्‍ठ समाजसेवक व मैगसेसे पुरस्काराने सन्मानित आहेत.)