1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:56 IST)

दर्जेदार शिक्षण इंग्रजी शाळेतचं असतं हे डोक्यातून काढून टाका: बच्चू कडू

bachhu kadu
इंग्रजीत पोरगं बोललं की, बाप उड्या मारतो. मात्र इंग्रजी बोलतो म्हणून सगळे हुशार असं नाही. इंग्रजी म्हणजे दर्जेदार असतं हे डोक्यातून काढून टाका, मराठी शाळा सुद्धा दर्जेदार असतात, हे अभिमानाने सांगता आलं पाहिजे. आम्ही आमच्याच भाषेला पायाखाली ठेवून इंग्रजीचा वाहवा करत असू तर ते चुकीचे असल्याचे सांगत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या कारभारावर ताशेरे ओढले.
 
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बच्चू कडू बोलत होते.
 
यावेळी कडू म्हणाले की, "आर्थिक विषमता चालेल, परंतु ज्या दिवशी देशामध्ये शैक्षणिक विषमता निर्माण होईल, त्या दिवशी देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता शैक्षणिक विषमता वाढत चालली आहे. आज मंत्र्यांचं तुमचं पोरगं चांगल्या शाळेत शिकतं आणि आम्हाला मते देणाऱ्याच्या पोराला शिक्षण भेटते की नाही हाच आमच्या पुढे प्रश्न आहे."
 
इंग्रजी शिकवलेले 20 टक्के पोरं गावाच्या बाहेर जातात, 80 टक्के गावातच राहतात, त्यांच्यासाठी आमच्याकडे काय व्यवस्था आहे, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणाधिकाऱ्याला परत करण्याची ताकद जर चपराशी आणि संस्थाचालकांमध्ये आहे तर सरकार आहे कुठे? असा सवालही कडू यांनी यावेळी केला.