सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार का, या प्रश्नाला गिरीश महाजन यांनी सूचक प्रतिक्रिया दिली
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २७ उमेदवारांनी माघार घेतली. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार का, या प्रश्नाला गिरीश महाजन यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष शुभांगी पाटील या मूळ भाजपच्या असल्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांचे मन वळविण्यात येईल, अशी चर्चा केली जात असताना पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली. नाशिकमध्ये भाजपने उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक भाष्य केले.
सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार का?
गिरीश महाजन म्हणाले की, त्यांनी पाठिंबा मागितला तर, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्य निर्णय घेतील. कारण, आम्हालाही जागा निवडून आणायची आहे. लवकरच यावर निर्णय होईल. तसेच, आमच्याकडे उमेदवाराची लाईनच होती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या मनात वेगळी काहीतरी रणनिती असेल. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे, असे गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले. गिरीश महाजन यांनी यावेळी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली
Edited By - Ratnadeep Ranshoor