सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (08:31 IST)

चाकू दुसऱ्याच्या हातात दिल्याने गुन्हा लपत नाही; नाना पटोलेंच्या आरोपाला राष्ट्रावादीचं उत्तर

Suraj Chavan
भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. भंडारा-गोंदिया जिल्हा परीषदेच्या निकालानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलाताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी ने अनेक ठिकाणी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही (NCP) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
आम्ही जयंत पाटील, व प्रफुल पटेल, यांच्या सोबत सुध्दा बोललो होतो, तरीही त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपा सोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुध्दा राष्ट्रवादी भाजप सोबत जात युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. त्यावर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "स्वतः पाठीत सुरा खुपसून चाकू दुसऱ्याच्या हातात दिल्याने गुन्हेगाराचा गुन्हा लपत नसतो. नाना पटोलेजी कोणी कोणाच्या पाठीत सुरा खुपसला हे महाराष्ट्र्र बघतोय." असं प्रत्युत्तर सुरज चव्हाण यांनी दिलं आहे.
 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपशी सुरु असलेल्या संघर्षात तिन्ही पक्ष एकत्र असल्याचं दिसत होतं, मात्र आता पुन्हा एकदा अंतर्गत खदखद बाहेर येत असल्याचं पाहायला मिळतंय. नाना पटोले यांनी अत्यंत टोकाचं विधान केलं असून, त्यामुळे त्यांची आतापर्यंतची एकुणच सगळी नाराजी बाहेर पडली असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, हा प्रकार नाना पटोलेंनी श्रेष्ठींच्या कानावर टाकणार असल्याचं सांगितलं. तसंच ते कायमचा सोक्ष-मोक्ष लावू असं म्हटल्याने येणाऱ्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध बिघडण्याची शक्यता बळावली आहे.