मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (16:42 IST)

ग्राउंड रिपोर्ट : शेतकरी प्रश्नासाठी भारत बंद, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने, रास्तारोको

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंद पुकारला आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीनेही भारत बंदला पाठिंबा दिला असून राज्यात बंद ठेवण्याचं सांगण्यात आले. त्यामुळे ठिकठिकाणी या बंदला वेगवेगळ्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यानी आंदोलने केली. याच बंदचा घेतलेला हा आढावा..........
 
मुंबई
मुंबईतून भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आलेत. तर दादरमधील फूल मार्केट बंद तर भाजी मार्केट सुरुच आहे. मुंबईतल्या गोवंडीच्या शिवाजीनगर या ठिकाणी अनेक दुकानं सुरू आहेत. मात्र, या विभागातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी चक्क बैलगाडीत बसून एक रॅली काढली आणि शिवाजीनगर चौकात येऊन रास्ता रोको सुद्धा केला. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी थोडा वेळ रस्त्यावर बसून रस्ता रोको केला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी अबू आझमी यांना बैल गाडीतून उतरवून गाडीत घातले आणि पोलीस ठाण्यात नेले. नवी मुंबईतही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वाशी टोलनाक्यावर आंदोलकांनी रास्तारोको करत रोष व्यक्त केला.  तीन वेळा या टोलनाक्यावर रास्तारोको करून जोरदार आंदोलन केलं. काही आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावरही रास्तारोको केल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.मालाडमध्ये काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन जोरदार निदर्शने केली. यावेळी मालवणी व मालाड रेल्वे स्थानक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने मंजूर केलेले हे तीन कायदे शेतकऱ्यांना स्वत:च्याच भूमीत मजूर बनवणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान समर्थन मुल्य (M.S.P) देणारी कृषी उत्पन्न बाजार समिती (A.P.M.C) व्यवस्था संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप शेख यांनी यावेळी केला. 
 
ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जोरदार आंदोलन करत राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र आणि मोदी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात ट्रॅक्टर, नांगरसह शेतकरी देखील सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाणे पोलिसांनी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. 
 
कल्याणमध्ये केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन दुकाने आणि रिक्षा बंद केल्या. शेतकऱ्यांनी  पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, सकाळपासून काही प्रमाणात दुकाने आणी रिक्षा सुरु होत्या त्यामुळे दुपारी १२ वाजल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी दुकाने आणी रिक्षा बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले.  
 
नागपूर 
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्रान्सपोर्ट किसान एकता आणि नागपूर गुरुद्वारा कमिटीने नागपुरात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. शीख समुदायातील नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. ऑटोमोटिव्ह चौकात आंदोलन सुरू झालं असून या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. नागपूरच्या सीताबर्डी मार्केट काही दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
 
पुणे
पुण्यात महाविकास आघाडीतील शहर पातळी वरील नेते मंडळी सहभागी झाले होते. मात्र या आंदोलन दरम्यान माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीचा फोटो हाती घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. पण काही वेळातच तो फोटो, चौकात असलेल्या सेनापती बापट यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो बराच वेळ तसाच पडून राहिला.
 
पुण्यातील अलका चौकात महा विकास आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अन्य संघटना शहर पातळीवरील न सकाळी १० वाजल्यापासून सहभागी झाले होते. कृषी कायद्या विरोधात अलका चौक ते मंडई पर्यंत मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवनगी नाकारल्याने, आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो आंदोलन ठिकाणी आणला. पण आंदोलनकर्ते प्रत्येक जण सेल्फी काढण्यासाठी लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो एक दुसऱ्याकडे देताना दिसत होते. एका कार्यकर्त्याच्या लक्षात येताच, त्याने तो फोटो हातामध्ये धरण्यास सांगितला. पण ज्या व्यक्तीने लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो हातामध्ये धरला. त्याचा फोटो प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामध्ये येत नसल्याने अखेर त्याने तो फोटो सेनापती बापट यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर ठेवला. तो फोटो जवळपास त्या ठिकाणी तासभर तसाच होता. 
 
नाशिक 
कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता. शहरातील नाशिकरोड येथील बिटको उड्डाण पुलाखालील भाजी बाजार विक्रेत्यांनी देखील बंद पाळला असून तसा फलक लावला होता. शहरातील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. तसेच बाजार पेठेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
 
सोलापूर 
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज माकपच्यावतीने चक्का जाम करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा चक्का जाम मोडीत काढत कार्यकर्त्यांची धरपकड केली. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात महिलांचा भव्य मोर्चा निघाला होता, या मोर्चाने, सोलापूर-विजयपूर रोडवर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजसमोर चक्का जाम आंदोलन केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता याच फौजफाट्याने चक्का जाम मोडीत काढला. माजी आमदार नरसय्या आडम यांना देखील पोलीसांच्या ताब्यात घेतले.  
 
लातूर 
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या लातूर बंद मध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाचीचेही प्रसंग घडले. लातूर बंदचे आवाहन करण्यासाठी शिवसेनेने मोटारसायकल रॅली काढली. ही रॅली गंजगोलाईकडे जात असताना पोलिसांनी हनुमान चौकात अडवली. यावेळी पोलिसांनी गंजगोलाईत रॅली घेऊन जाण्यास मज्जाव केला.
 
जालना 
भारत बंदमध्ये जालन्यात काँग्रेसने पाठिंबा देत सहभाग नोंदवला.भारत बंद निमित्त जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  
 
नंदूरबार
नंदुरबारमध्ये सत्यशोधक कष्टकरी शेतकरी सभेने शहरातील नेहरू चौकात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून केंद्र शासनाने लागू केलेले कृषी कायदे त्वरित रद्द करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. नंदुरबार वगळता या सर्व कडे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
 
राज्यांमधील विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम 
भारत बंदमुळे अनेक राज्यांमधील विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. यात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचाही समावेश आहे. काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, काही परीक्षांच्या सुधारित तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
ICAI CA Foundation Examinations Postponement : भारत बंदमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडिया अर्थात ICAIच्यावतीने घेण्यात येणारी सीए फाऊंडेशन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून, १३ डिसेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
 
भारत बंदमुळे राज्यात एसटी बसच्या ३७१७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.