शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : बाळासाहेब थोरात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले. अशी प्रतिक्रया काँग्रेसचे नेते आणि महाविकासआघाडीतील कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव असून पक्षात त्यांची स्वीकारार्हता आहे का हे पहावे लागेल, असं वक्तव्य शरद पवारांनी नुकतेच एका मुलाखतीत केले होते. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.
बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे, आमचे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधींनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करतायत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत.'
राहुल गांधी करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत. त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं. असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.