गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नागपूर , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:53 IST)

नागपूर येथे शेंगदाण्याला पिस्ता म्हणून विकलं

Groundnut sold as pistachio in Nagpur
नागपुरात काही भेसळखोरांनी शेंगदाण्याला रंगवून, सुकवून पिस्ता बनवण्याचा हा प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा घालून उघडकीस आणला आहे. शेंगदाण्याला घातक रंगाने रंगवून, त्याची कात्रण करून ती मिठायांमध्ये वापरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा घातलेल्या इमारतीतून तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला असून नागपुरातील कोणकोणते मिठाईवाले याचा वापर करत होते याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे. 
 
सोनपापडी, पेढा, बर्फी, लाडू सारख्या अनेक मिठायांवर पिस्ता किंवा बदाम या महागड्या सुकामेव्याची कात्रण, चिप्स सजावट तसेच चवीसाठी लावली जाते. मात्र, सुकामेवाचे दर बरेच जास्त असल्याने काही भेसळखोरांनी शेंगदाण्यातून पिस्ता आणि बदामसारख्या महागड्या सुकामेव्याच्या कात्रण तयार करणे सुरु केले. त्यांचे हे उद्योग अनेक महिने राजरोसपणे सुरु होते. मात्र, काही दक्ष नागरिकांनी त्याची माहिती  अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आणि सर्व प्रकार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांप्रमाणे ही शुद्ध भेसळ असून ग्राहकांची फसवणूक ही आहे. 
 
नागपुरात काही भेसळखोरांनी 90 रुपये किलोच्या सडक्या शेंगदाण्याला रंगवून, सुकवून त्याला पंधराशे रु किलोच्या पिस्ता सारखा बनवण्याचा उद्योगच सुरु केला आहे. नागपूरच्या बाबा रामसुमेर नगर परिसरातील एका इमारतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जेव्हा पोहोचले. तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याला घातक हिरव्या रंगात रंगवून पिस्ता सारखे बनवण्याचे प्रकार उघडकीस आले.