सुनील केदार यांचे आत्मचिंतन आणि सामूहिक उपोषण सुरु
हिंगणघाट जळीतकांडांतील 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर आज वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी या घटनेच्या निषेधार्थ आत्मचिंतन आणि सामूहिक उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या या उपोषणात अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे उपोषण सलग 12 तास सुरु राहणार आहे.
महिलांचा सन्मान हा फक्त शाब्दिक नसून तो कृतीत यायला पाहिजे, त्यामुळे आपण हे उपोषण करत असल्याचे स्पष्टीकरण सुनील केदार यांनी दिलं. याशिवाय “आत्मचिंतन आणि लोकांमध्ये प्रबोधन हा महत्त्वाचा विषय आहे. लोकप्रबोधनाच्याच माध्यमातून क्रांती घडू शकते. लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सुविचार येऊ शकतात, लोकप्रबोधनाच्या माध्यमातूनच अन्यायाविरोधात आपण लढाई करु शकतो”, असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला..