बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (17:00 IST)

गुजरातचा विजय ऐतिहासिक, मोदी आणि भाजपचं अभिनंदन- उद्धव ठाकरे

uddhav thackeray
एक्झिट पोलमध्ये दिसलेल्या कलांनुसार गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपाचे उमेदवार 159 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
 
काँग्रेस 15 तर बहुचर्चित आम आदमी पक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्षांना आणि अपक्षांना 3 जागांवर आघाडी मिळाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा 28, काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत.
 
गुजरातमध्ये 1962 पासून विधानसभेच्या 14 निवडणुका झाल्या. आज (8 डिसेंबर) पंधराव्या विधानसभेसाठीचा निकाल जाहीर होतोय.
 
गुजरातचा विजय ऐतिहासिक, मोदी आणि भाजपचं अभिनंदन- उद्धव ठाकरे
गुजरातच्या विजयाबदद्ल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे.
 
'गुजरातचा विजय ऐतिहासिक आणि विक्रमी आहे. मी भाजप आणि मोदींचं अभिनंदन करतो." असं ते म्हणाले.
 
हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल काँग्रेस आणि दिल्ली मनपात विजय मिळवल्याबद्दल त्यांन आपचं ही अभिनंदन केलं आहे.
 
"गुजरातचा निकाल अपेक्षितच होता.गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवली गेली. त्यामुळे जनतेने भाजपला भरघोस मतदान केलं. या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही फळले असावेत," असा टोलाही त्यांनी लगावला.
 
आपने गुजरातमध्ये मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हेही स्पष्ट झालं. असो, ज्याचं त्याचं राजकारण सोयीनुसार चालत असतं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
 
भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल
भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करताना दिसतेय.
 
गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण जागा 1962 साली 154, 1967 साली त्या वाढून 168 आणि 1975 पासून त्यात आणखी वाढ होऊन 182 झाल्या, त्या आजतागायत 182 च एकूण जागा आहेत.
 
गुजरात विधानसभेचा इतिहास पाहिल्यास आजवर म्हणजे 2017 पर्यंत कधीच कुठल्या पक्षाने 150 चा आकडा पार केला नाही.
 
1962 साली 154 पैकी 113 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या, तर 1972 च्या निवडणुकीत 168 पैकी 142 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या.
 
1972 साली विधानसभेच्या जागा वाढून 182 झाल्यानंतर, 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसन 149 जागा मिळवत विक्रमाची नोंद केली होती.
 
यानंतर म्हणजे 1985 च्या निवडणुकीनंतर कुठलाच पक्ष 127 जागांच्या वर जाऊ शकला नाहीय.
 
 
किती टक्के झालं होतं मतदान?
गुजरातमध्ये 182 जागांसाठीचं मतदान दोन टप्प्यांत पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठीचं मतदान गुरुवार, 1 डिसेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठीचं मतदान 5 डिसेंबर रोजी घेण्यात आलं. याठिकाणी एकूण 64.34 टक्के मतदान झालं.
 
तर हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 68 जागांसाठीचं मतदान 12 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. एकाच टप्प्यात घेण्यात आलेल्या या मतदानाची टक्केवारी 75.6 टक्के अशी विक्रमी होती.
 
या दोन्ही निवडणुकांचा निकाल आज एकाच दिवशी जाहीर केला जात आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं गृहराज्य म्हणून गुजरात तर केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं गृहराज्य म्हणून हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांना महत्त्व आहे.
 
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.