12 तास कीर्तनाचा रेकॉर्ड! 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' मध्ये नोंद
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांनी नारायणगाव येथे सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन करून रेकॉर्ड कायम केले आहे. विशेष म्हणजे किर्तनाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद केली आहे.
गेल्या 12 वर्षांपासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली. पावनखिंडीच्या लढाईत 17 तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांच्यासाठी प्रेरणा ठरली. 17 तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन करू शकतो असा निश्चय केल्यावर त्यांनी हा विक्रम गाठला.
तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाच्या अभांगवर समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांनी विविध विषय निवडलले. व्यसन, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम प्रभू, तुकाराम महाराज, मराठी भाषा सध्य स्थिती आदींचा यात समावेश होता.
महाराजांनी नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे 14 जून रोजी सकाळी 9 वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील 3 चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नावं कोरले आहे.
या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह 22 जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली.
वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे वतीने मेडल व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.