सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 नोव्हेंबर 2023 (17:43 IST)

छगन भुजबळ : 'हे केस एका आंदोलनानं पिकले नाहीत; जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं केली आहेत'

chagan bhujbal
“मी काही बोललो तर महाराष्ट्रातील अनेक म्हणतात, दोन समाजांत तेढ निर्माण करू नका, महाराष्ट्र पेटवू नका. ते काहीही बोलतात ते आम्ही ऐकतो.”
 
“लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आमची लायकी काढतो. लायकी होती, म्हणूनच शिवरायांसाठी लढलो.”
 
छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज (26 नोव्हेंबर) हिंगोलीत ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंवर टीका केली. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावर, त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवरही आपली मतं मांडली.
 
भुजबळ यांनी म्हटलं की, मी बीडमध्ये गेलो तेव्हा म्हणाले की, आग लावायला गेलो. ज्यांनी अख्खं बीड पेटवलं. त्यांना बोला ना. पेटवायला अक्कल लागत नाही पटवायला अक्कल लागले, जाळायला अक्कल लागत नाही जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते.
 
मनोज जरांगे यांचं नाव न घेता भुजबळांनी म्हटलं की, नवीन नेते आता भुजबळ म्हातारे झालं असं नवीनच बोलत आहेत. सगळेच म्हातारे होणार, तुमचे आई-वडीलही झाले असतील. तू पण होशीलच. पण हे केस एका आंदोलनानं पिकलेले नाहीत. जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत. आंदोलने मला नवीन नाहीत.
 
ओबीसी समाजाला दोन्ही बाजूने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडून कुणबी सर्टिफिकेट देऊन आरक्षण दिले जात आहे. दुसरीकडे बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, तुमचं आमचं आरक्षण चुकीचं आहे, त्यांना बाहेर काढा. म्हणजे सगळ्यांना ओबीसी आरक्षणाच्या बाहेर काढा आणि त्यांच्यासाठी सगळी जागा करून द्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
 
क्षीरसागर कुटुबीयांना भेटायला गेलो होतो, त्यांनी त्यांच्यावर किती कठीण वेळ होती ते सांगितलं. पण संदीप क्षीरसागरला रोहित पवार नव्या नेत्याकडे घेऊन गेले. त्याने तुझं घर जाळलं, बायका पोरं संकटात टाकली आणि त्याची माफी मागायला गेला का? बीडमध्ये एवढी जाळपोळ झाली पण निषेधही केला नाही, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
 
मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ
आर्थिक निकषावरील 10 टक्के आरक्षणाचा 85 टक्के फायदा मराठा समाजानं घेतला. मराठा समाजानं आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ झाला, असं भुजबळांनी म्हटलं.
 
छगन भुजबळांनी म्हटलं की, मराठा समाजात गरीब आहेत त्यांना आमचा विरोध नाही. पण त्यांना हे सर्व दिलं जात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं 70 हजार लाभार्थ्यांना 5107 कोटी दिले. ओबीसी महामंडळाला एवढ्या वर्षात अजून एक हजार कोटीही मिळालेलं नाही.
 
एमपीएससीच्या ज्या परीक्षा झाल्या त्यात कट ऑफ पॉइंट ओपनमध्ये 106 जागांना 96.5 होता आणि खेळात 27 टक्के. ओबीसीमध्ये 106 जागा होत्या त्यांचा कट ऑफ पॉइंट होता 96.5 आणि स्पोर्ट्समध्ये 64 टक्के, मग तुम्ही आमची लायकी काढता, असं त्यांनी म्हटलं.
 
‘शिंदे समिती रद्द करा, दोन महिन्यांतील कुणबी प्रमाणपत्रांना स्टे द्या’
ओबीसींनी आपसातील मतभेद बाजूला ठेवा आणि ओबीसींचा आवाज बुलंद करा, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.
 
मला नेतृत्वाची, आमदारकीची किंवा मंत्रिपदाची हौस नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या, पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका. सारथीला मिळालं ते ओबीसी, महाज्योती यांना मिळालं पाहिजे, असं छगन भुजबळांनी म्हटलं.
 
शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, कारण सुप्रीम कोर्टानं मराठा समाज मागास नाही हे सांगितलं आहे. गेल्या दोन महिन्यांतील कुणबी प्रमाणपत्रांना स्टे द्या. हे चालणार नाही, असंही भुजबळ यांनी म्हटलं.
 
भुजबळ यांनी म्हटलं, “ओबीसी आयोगाला मराठा समाजाचे मागासपण सिद्ध करण्याचे आदेश असतील. मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण चालणार नाही, सर्वांचं सर्वेक्षण करा आणि ते इतरांच्या पुढे आहेत का बघा आणि मग आरक्षण द्या.
 
सगळे नेते जनगणना करा असं सांगतात मग एकदा जनगणना करून दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या. मग ओबीसी, दलित, मागासांची शक्ती किती आहे हे लक्षात येईल.”
 
बिहार जातिनिहाय जनगणना करू शकतं तर महाराष्ट्र का करू शकत नाही. त्यात जे होईल ते मान्य करायला तयार आहोत. एकदाची जनगणना करा आणि सर्वांना न्याय द्या. पण ही लढाई दूरपर्यंत लढावी लागेल, असं भुजबळांनी म्हटलं.
 
मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर- केस पांढरे होऊन उपयोग काय?
केस पांढरे होऊन उपयोग काय. एखाद्या समाजाबाबत गरळ ओकायची, कायद्याच्या पदावर बसून असं करायचं मग केस पांढरे असल्याचा फायदा काय? असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिलं.
 
मराठ्यांनी तुम्हाला कसं जोडलं, कसं मोठं केलं, तुम्हाला किती प्रतिष्ठेच्या पदावर बसवलं आणि तुम्ही त्यांना तोडलं. त्यामुळं जोडायची आणि तोडायची भाषा तुम्हाला शोभते कुठं, असा प्रश्नही जरांगेंनी विचारला.
 
ओबीसींना मी कधीही विरोध केलेला नाही. नेत्याला सोडून मी कुणालाही बोललो नाही. गाव खेड्यांत आम्ही एकत्र राहतो. शासकीय नोंदी असलेल्यांचं आरक्षण कोणीही नाकारू शकत नाही. ते कायद्यानं मिळालेलं आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
 
त्यांच्या सभा दंगली घडवण्यासाठी आहे, त्याला ‘दंगलसभा’ नाव द्यायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.
 
आंदोलन शांततेतच करायचं आहे, वेगळ्या आंदोलनाला आपलं समर्थन नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.