1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जून 2024 (16:55 IST)

उत्तरेत होरपळ तर दक्षिणेत पावसाचं आगमन, यापुढे मान्सूनची वाटचाल कशी राहील?

rain
दक्षिणेत मान्सूनमुळे पाऊस आणि उत्तरेत उष्णतेची लाट, अशी स्थिती सध्या भारतात परिस्थिती दिसून येते आहे. मान्सून कुठे पोहोचला आहे, पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो जाणून घेऊयात.नैऋत्य मोसमी वारे पुढच्या दोन तीन दिवसांत आणखी आगेकूच करतील.
 
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार अरबी समुद्र, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग तसंच बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकतील.
 
कर्नाटकात बंगळुरूसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली असून, 2 जूननंतर दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
 
तीन जूनसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड तसंच विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वारा आणि पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
तर उत्तर कोकणात ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. दरम्यान, वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे, तरी इथे पुढचे तीन दिवस उन्हाचा तडाखा जाणवेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
 
उष्णतेमुळे उत्तर भारतात हिमालयीन प्रदेशातील जंगलांमध्ये अनेक ठिकाणी वणवे पेटत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांत हिमाचल प्रदेशात शिमलाच्या आसपास तर जम्मू काश्मिरमध्येही मोठे वणवे पेटले. या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलं, वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे.
 
उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उष्णतेच्या काळात अशा आगी लागण्याचं प्रमाण वाढतं. यंदा किती दिवस अशी उष्णतेची लाट होती, याची आकडेवारी हवामान विभागानं जाहीर केली आहे.
 
जास्त काळ राहणाऱ्या उष्णतेच्या लाटेकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं असं तज्ज्ञांना वाटतं.

Published By- Priya Dixit