मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

हर्षवर्धनजाधव यांनी राजकीय संन्यास घेतला

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले होते. राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव चर्चेत होते. हर्षवर्धन जाधव केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावईदेखील आहेत.
 
हर्षवर्धन जाधव यांनी निवृत्ती जाहीर करताना सांगितलं आहे की, “लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो”.
 
“प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. त्यामुळे आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा,” असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं आहे.