शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (22:08 IST)

'तो' विद्यार्थी दानवेंचा नातेवाईक, केली आत्महत्या की हत्या ?

नाशिकच्या के के वाघ इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह सैय्यद पिंपरी येथील पाटामध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अभिषेक कैलास खरात (वय २२) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे हा विद्यार्थी मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक हा केके वाघ कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. दरम्यान (दि.२६) फेब्रुवारीला अभिषेक राहत्या ठिकाणाहून रात्री १० वाजेच्या सुमारास मिरची हॉटेल येथे जाऊन येतो असे सांगून गेला होता, मात्र त्यानंतर तो परत आला नाही. याबाबत त्याचा चुलत भाऊ सुरज खरात यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता अभिषेक (दि.२७) फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेच्या सुमारास नांदूर नाका परिसरात पाहण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर त्याचा थांगपत्ता लागला नाही.
 
दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अभिषेकचे छायाचित्र सोशल मीडियामध्ये व्हायरल करून याबाबत कुणाला माहिती मिळाल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केले होते. तपास सुरु असतांना बुधवारी (दि.०२) रोजी अभिषेक खरात यांचा मृतदेह सैय्यद पिंपरी येथील पाटात आढळून आला.  ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय पाठवला आहे. दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नातलग असल्याचे समजते.