1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (08:29 IST)

जीव वाचविण्यासाठी त्याने उडी मारली.. पण तोच ट्रक त्याच्या अंगावर पडला आणि त्याने प्राण गमावले…

नाशिक जिल्ह्यात ट्रक पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला आहे.जीव वाचविण्यासाठी त्याने ट्रकमधून उडी मारली.मात्र तोच ट्रक त्याच्या अंगावर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील भावडबारी घाटात ट्रकचा अपघात झाला आहे.
 
विंचूर-प्रकाशा महामार्गावरील असलेल्या भावडबारी घाटात हा अपघात झाला आहे. या अपघातात बिहारमधील जीतन भानू सहा (वय ४०) कामगाराचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली होती. देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अधिक माहिती अशी की, मंगळवारी (15 मार्च) दुपारच्या सुमारास ट्रक (क्रमांक MH 18/ AA0399) नाशिकहून देवळ्या कडे निघाला होता. हा ट्रक कोंबडी खत घेऊन जात होता. भावडबारी घाट उतरत असताना घाटाच्या पायथ्याच्या वळणावर ट्रकचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला. यामुळे ट्रक पलटी झाला.
 
या ट्रकमध्ये असलेला मजूर जितन भानू सहा वय 30 ट्रक मधून पडून बाहेर पडला मात्र ट्रक त्याच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.  मयत मजुराला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.
 
दरम्यान घाट परिसरात अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर वाहतूक कोंडी दूर करण्यात आली आणि मग त्यानंतर घाटातील वाहतूक सुरळीत झाली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.