शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (08:49 IST)

उद्धव ठाकरेंचा ‘गद्दार’ शब्दप्रयोग वज्रमूठ सभेदरम्यान घणाघाती कसा ठरला?

uddhav thackeray
social media
महाविकास आघाडाची वज्रमूठ सभा रविवारी (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली.
 
सभेसाठी आलेल्यांपैकी बहुतेक जण हे उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत होतं.
 
एकनाश शिंदे यांच्या सरकारबद्दल बोलताना नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या नागरिकांनी ‘गद्दार’ हा शब्द अनेकदा वापरला.
 
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटानं हा शब्द त्यांना हवा तसा सामान्य माणसांपर्यंत पोहचवल्याचं हे निदर्शक होतं.
 
दुपारी साडे चार वाजता माझी भेट नंदू बोडखे यांच्याशी झाली. ते संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमधून आले होते.
 
सभेसाठी का आले, असं विचारल्यावर ते म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ झालं. त्याच्यामधी मी स्वत: बसलेलो आहे.”
 
ते पुढे म्हणाले, “शिंदे सरकारच्या काळात कापसाला भाव नाहीये. शेतकऱ्यानं कापूस घरात ठेवला आहे. त्याला पिसा झालेल्या आहेत. कापसाजवळ गेलं की रात्रभर खाज येते अंगाला. कापसाच्या रुमकडे शेतकरी जाऊ शकत नाही. एवढी वाईट परिस्थिती या गद्दार सरकारनं शेतकऱ्याची केलेली आहे.”
 
प्राध्यापक सचिन अहिरे नाशिकहून दुचाकी चालवत संभाजीनगरच्या सभेला आले होते.
 
ते म्हणाले, “आज महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला गेले. या सरकारनं महाराष्ट्राशी गद्दारी केली. शेतकऱ्यांशी गद्दारी केली. महिलांसाठी एसटीमध्ये 50 % सवलत देत आहेत, पण दुसरीकडे सिलेंडरचे भाव वाढले आहेत.”
 
जालन्यातील मानेगावचे सरपंच सभेसाठी आले होते. त्यांनी डोक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची टोपी घातली होती.
 
ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमधील जे आमदार गद्दार झालेत त्यांच्यासाठी आजची सभा चपराक असेल. गद्दार आमदारांची अवस्था यामुळे सळो की पळो होईल.”
 
'शेतमालाला भाव द्या हीच अपेक्षा'
सभास्थळी मागच्या बाजूस बसलेल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर मी मध्यभागी बसलेल्या लोकांकडे गेलो.
 
संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातील मुखेड गावातील नागरिकांचा एक गट सभेसाठी आला होता. नेत्यांची भाषण सुरू व्हायला अद्याप वेळ होता.
 
यापैकी लक्ष्मण सोनुने यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. संध्याकाळी 6 च्या सुमारास आमची चर्चा सुरू झाली.
 
नारायण यांच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यांच्या गावातून माजी सरपंच समाधान गरुड एक गाडी सभेसाठी आणली होती. त्यात 7 जण आले होते.
 
सभेकडून काय अपेक्षा आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले, “शेतीला दिवसा 8 घंटे सतत लाईन पाहिजे. शेतीमालाला भाव भेटला पाहिजे. कापसाला गेल्या वर्षी 10 ते 12 हजार भाव होता, यंदा 7 ते 8 हजार भेटत आहे.”
 
राजकारण्यांनी कशावर बोलायला हवं, यावर ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. सध्याच्या माहोलमध्ये हे शेतकऱ्याचं भलं करू शकतात, असा विश्वास वाटतो. म्हणून आम्ही या सभेला आलोय.”
 
'नामांतर, सावरकर हे पण महत्त्वाचे मुद्दे'
महाविकास आघाडीची सभा सुरू असताना त्याच काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं सावरकर गौरव यात्रेचं आयोजन केलं होतं.
 
महाविकास आघाडीची सभा आणि भाजपची सावरकर गौरव यात्रा तेव्हा होत होती, जेव्हा दोनच दिवसांपूर्वी शहरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
 
अशास्थितीत सभा घेणं योग्य वाटतं का, यावर समाधान गरुड म्हणाले, “दंगलीचा आणि सभेचा काही संबंध नाही. आमच्यासाठी नामांतर, सावरकर हे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि शेतीचे प्रश्न पण महत्त्वाचे आहेत.”
 
आमचं हे बोलणं सुरू असताना मुखेडचेच संजय शेवाळे पुढच्या खुर्चीवर येऊन बसले आणि म्हणाले, “सभेचा कार्यक्रम आधीच नियोजित होता, दंगल नंतर झाली. कार्यक्रम रद्द झाला असता तर कार्यकर्ते नाराज झाले असते, कार्यक्रमाचा जल्लोष कमी झाला असता.”
 
“सध्या राजकारणाचा पोरखेळ झाला. राजकारणी फक्त त्यांचं त्यांचं बघतात. यात सामान्य माणूस भरडला जातो. जातीपातीचं राजकारण चालतं. शेतमालाला चांगला भाव द्यावा, आमची एवढी एकच मागणी आहे,” राजकारणाच्या सद्यस्थितीविषयी समाधान चिंता व्यक्त करत होते.
 
मुखेडच्या शेतकऱ्यांच्या लाईनमध्येच पुढे नांदेडमधील दोघं जण बसले होते. आमच्या घरचा पेशंट संभाजीनगरला दवाखान्यात आणला आहे आणि योगायोगानं सभा होती तर ती ऐकायला आलोय, असं ते म्हणाले.
 
तुमचे प्रश्न काय आहेत, असं विचारल्यावर ते म्हणाले, “गेल्या वर्षी सोयाबीनला 7 ते 8 हजार रुपये भाव मिळाला. यंदा आम्हाला 5 हजार रुपये क्विंटलनं विकावी लागली.”
 
आम्ही सामान्य माणसं आहोत. बातमीत आमचं नाव नका टाकू, असंही ते पुढे म्हणाले.
 
6 वाजून 26 मिनिटांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माईक हातात घेतला. “पोलिस सभेला येणाऱ्यांच्या गाड्या बाबा पेट्रोल पंपाजवळ अडवत आहेत. पोलिसांना नम्र विनंती की गाड्या सोडा. नाहीतर आम्ही तुमची मस्ती जिरवू,” असं ते म्हणाले.
 
मागे वळून पाहिलं तर सभास्थळी अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.
 
माझ्या मागेच विठ्ठल पवार बसले होते. ते जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथून आले होते. त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे.
 
ते म्हणाले, “बाबा पेट्रोल पंपाजवळ गाड्या लावा, असं पोलिस सांगत आहेत. त्यामुळे मग तिथून पायी चालत लोकांना सभा ऐकायला यावं लागत आहे.”
 
बाबा पेट्रोल पंप ते सभेचं स्थळ यात जवळपास 4 ते 5 किलोमीटर एवढं अंतर असल्याचं स्थानिक लोक सांगत होते.
 
काही वेळानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर लोक सभास्थळी यायले लागले आणि बघता बघता संपूर्ण मैदान भरुन गेलं.
 
सव्वा सात वाजता उद्धव ठाकरे यांचं सभास्थळी आगमन झालं. मैदानातील आणि मैदानाबाहेरील गर्दी पाहून या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होईल का, असा प्रश्न मनात येत होता.
 
या सभेचा काही परिणाम होईल का, असा प्रश्न मी सभेसाठी आलेल्या गणेश चांदोडे यांना विचारले. ते जालन्याहून आले होते.
 
ते म्हणाले, “100 % या सभेचा परिणाम होईल. लोक मतं देतील. कारण लोकांनी जनभावना उद्धव ठाकरेंच्या बाजूनं आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार पडलं, ते लोकांना आवडलेलं नाहीये.”
 
यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं भाषण सुरू होतं.
 
“आपल्या तिन्ही पक्षांची वज्रमूठ कायम राहिली, आपण एकत्र राहिलो तर राज्यात 180 पेक्षा जास्त जागा आपल्याला मिळेल,” असं ते म्हणत होते.
 
वरती नजर टाकली तर 4 ते 5 ड्रोन कॅमेरे सभास्थळ नजर ठेवून होते. जसजसा ड्रोन जवळ येत असे, तसतसे माणसांची डोके त्याला पाहण्यासाठी वरच्या दिशेनं जात होते.
 
7 वाजून 24 मिनिटांनी उद्धव ठाकरेंचं व्यासपीठावर आगमन झालं. त्यावेळी माझ्या समोर बसलेले आजोबा ताडकन उभे राहिले आणि त्यांनी आपोआप त्यांची मूठ आवळली. त्यानंतर बराच वेळ फटाके फुटत राहिले.
 
अजित पवारांचं भाषण सुरू असताना माझ्या शेजारची खुर्ची रिकामी होती. तिथं भिकू पटेल येऊन बसले. संभाजीनगरच्या हर्सूल भागात ते राहतात.
 
“मुसलमान लोक या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर आले असते, पण त्यांना रोझा सोडण्यासाठी थांबावं लागलं. त्यामुळे कमी मुसलमान दिसत आहेत,” असं ते म्हणाले.
 
एव्हाना 7 वाजून 35 मिनिटं झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं भाषण सुरू झालं होतं. त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी आणि बेरोजगार युवकांचे प्रश्न मांडले.
 
मी आणि भिकू यांनी आमचं संभाषण सुरू ठेवलं. तुम्हाला सभेसाठी का यावं वाटलं, असं विचारल्यावर ते म्हणाले, “कारण हे सगळे एकत्र आहे. ही महाविकास आघाडी आहे.”
 
नामांतरामुळे नाराजी?
संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपूर्वी हिंसाचार झाला. अशा परिस्थितीत सभा घेणं योग्य वाटतं का, या प्रश्नावर भिकू म्हणाले, “सभा होऊ नये म्हणून भाजपनं ते (हिंसाचार) प्रकरण केलंय. त्यांना जाणूनबुजून माहोल खराब करायचा आहे. पण त्यांची ही पॉलिसी प्रत्येक माणसाच्या लक्षात आली आहे. ही सभा होऊ नये म्हणून भाजपनं तो गोंधळ घातला होता.”
 
दरम्यान, संभाजीनगरमधील हिंसाचाराच्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाही, असं भाजप नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
नामांतराविषयी काय वाटतं, यावर भिकू म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी नामांतराची घोषणा केली होती. पण एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी ते जास्त उचलून धरलं. म्हणून आमची नाराजी आहे.”
 
उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं चालत होतं. एकनाथ शिंदेंनी ते भंग केलं, असंही ते म्हणाले.
 
सभेच्या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होईल का, यावर ते म्हणाले, “100 % लोक मतं देतील.”
 
7 वाजून 56 मिनिटांनी उद्धव ठाकरेंनी भाषण सुरू केलं. त्यांनी त्यांच्या भाषणात नामांतर, सावरकर, हिंदुत्व, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला.
 
यावेळी त्यांनी मोदी आणि भाजप यांच्यावरही कडाडून टीका केली.
 
बरोबर 10 मिनिटांनी काही जण सभास्थळाहून बाहेर पडायला लागले. गेटजवळ जाऊन थांबू, म्हणजे भाषण संपलं की लवकर बाहेर पडता येईल, अशी त्यांची चर्चा सुरू होती.
 
8 वाजून 15 मिनिटांनी तर मागच्या अनेक खुर्च्या खाली व्हायला लागल्या होत्या. पुढच्या काही वेळेत उद्धव ठाकरेंच्या भाषणातील वाक्यांनी सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला.
 
8 वाजून 36 मिनिटांनी उद्धव ठाकरेंचं भाषण संपलं. भाषणादरम्यान त्यांनी ‘गद्दार’ या शब्दाचा उच्चार केला.
 
हा तोच शब्द होता, ज्याचा उल्लेख सभेसाठी जमलेला सामान्य माणूस वारंवार करत होता.
Published By -Smita Joshi