1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2023 (15:14 IST)

महाविकास आघाडीत जागा वाटप कसं होणार? बंडखोरी कशी थांबवणार?

नुकत्याच समोर आलेल्या दोन निकालांनंतर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पहिला निकाल म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा आणि दुसरा निकाल कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा. या दोन निकालांनंतर महाराष्ट्रात सध्या राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे.
 
या दोन्ही निकालांमुळे महाविकास आघाडीला राज्यात अधिक बळ मिळालं असून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचंही महाविकास आघाडीने जाहीर केलं आहे.
 
तसंच महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर तिन्ही पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यासाठी महाविकास आघाडीने यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
 
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या यासंदर्भात संघटनात्मक बैठका पार पडल्या असून महत्त्वाच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
असं असलं तरी आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीची पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे ह्या तीन पक्षांमधला समन्वय कायम राहणं हे देखील महाविकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान आहे.
 
हे तीन बलाढ्य पक्ष एकत्र निवडणूक कशी लढवणार? जागा वाटपाचं आव्हान महाविकास आघाडीचे नेते पेलणार? आणि महत्त्वाचं म्हणजे बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीतल्या पक्षांची रणनीती काय असेल?
 
जागा वाटपाचं गणित कसं जुळणार?
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं जाहीर तर केलं. पण जागा वाटप करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर कायम आहे.
 
14 मे रोजी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि इतर सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
 
या बैठकीत प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा झाली. या निकालात न्यायालयाची भूमिका आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे जनतेपर्यंत अधिकाधिक सोप्या आणि स्पष्ट भाषेत पोहचवण्याचं ठरलं. तर आगामी काळात महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू केल्या जातील असाही निर्णय घेण्यात आला. ही सभा पुणे येथे आयोजित केली जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
गेल्या काही काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.
 
यात शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयबाबात व्यक्त केलेली नाराजी. संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातली परस्पर टीका करणारी वक्तव्य. उद्धव ठाकरेंची नाराजी असं चित्र दिसल्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित झाले होते. पण कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडीने आपण एकसंघ आहोत अशी भूमिका घेतली आहे.
 
17 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत. तसंच विधानसभेच्या क्रमांक दोनच्या जागांवर लक्ष केंद्रीत करा असाही आदेश त्यांनी दिल्याचे समजते.
 
2019 विधानसभा निवडणुकीत 40 हून अधिक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात मुख्य लढत शिवसेनेसोबत झाल्याचं दिसून येतं.
 
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं.
 
अडीच वर्षं मविआची सत्ता होती. पण प्रत्यक्षात एकत्र निवडणूक लढवताना या तीन पक्षांसमोर अनेक आव्हानं आहेत.
 
यातलं पहिलं सर्वोत मोठं आव्हान म्हणजे जागा वाटप. 2004 सालापासून 2014 ची निवडणूक वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक विधानसभा,लोकसभा निवडणूक एकत्र लढवली आहे. त्यामुळे आघाडीत जागा वाटप आणि मतदारांचं समीकरण ठरलेलं आहे. पण आता आघाडीला शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत जागा ठरवायच्या आहेत.
 
आताचं पक्षीय बलाबल आपण पाहिलं तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53, काँग्रेसच्या 44 आणि शिवसेनेच्या 55 जागा आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील 55 आमदारांपैकी 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने या 40 जागांवर म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीत क्रमांक दोनचा उमेदवार किंवा शक्तीशाली उमेदवार उभा करणार.
 
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात, “शिंदे गटात गेलेल्या 40 जागांचं वाटप महाविकास आघाडीत होणार. तिथे ठाकरे गट आपला उमेदवार उभा करू शकते पण त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार शक्तीशाली असल्यास त्याला संधी दिली जाईल. उदाहरणार्थ, सातारा जिल्ह्यात पाटणमध्ये मंत्री शंभुराज देसाई विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात ठाकरे गटाकडे दुसरा तितक्याच ताकदीचा उमेदवार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि शंभुराज देसाई यांच्यात तिथे मुख्य लढत होते. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गट तडजोड करेल. पण अर्थात त्या बदल्यात दुसऱ्या जागा ठाकरे गट आपल्या पदरात पाडून घेणार.”
 
दीपक भातुसे सांगतात, महाविकास आघाडीसाठी जागा वाटपाचा तिढा सोडवणं निश्चितच सोपं काम नाही. जागा वाटपावरून यापूर्वी आघाडीतही रस्सीखेच होत होती आणि त्यावरून राजकीय संघर्ष सुद्धा व्हायचा. आता तर एकमेकांविरोधात लढणारे तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचं समिकरण जुळवणं मविआच्या नेत्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.
 
या तीन पक्षांमध्ये जागांचं समान वाटप होईल तसंच अपवादात्मक काही मतदारसंघांमध्ये ज्या पक्षांचा उमेदवार जिंकून येऊ शकतो तिथे त्यालाच प्राधान्य दिलं जाईल असंही जाणकार सांगतात.
 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला साधारण वर्ष बाकी आहे. त्यामुळे मविआ एवढ्या लवकर काही जागा वाटप ठरवणार नाही असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात. साधारण प्रत्येक पक्षाला एक तृतीयांश याप्रमाणे जागा वाटप होऊ शकतं अशीही शक्यता ते वर्तवतात.
 
ते सांगतात, “लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम विधानसभेवर होत असतो. सगळ्यात आधी मविआ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करेल. यात सगळ्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवतीलच असं नाही. आघाडीनेही स्थानिक पातळीवर सगळीकडे एकत्र निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक होईल. पण कटुता न वाढू देता ह्या निवडणुका मविआला पार पाडाव्या लागतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील मुद्दे आणि घटनाबाह्य सरकार हे मविआचं मूळ नरेटिव्ह असेल आणि हे लोकांपर्यंत पोहचवण्यात ते किती यशस्वी होतात यावर पुढचे निर्णय होतील.”
 
बंडखोरी रोखण्याचं आव्हान
महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात बंडखोरी होण्याची भीती सुद्धा मविआच्या नेत्यांना आहे. त्याचं कारण म्हणजे मविआच्या नेत्यांनी आपआपल्या जागा ठरवल्या तरी उर्वरित जागांवर आघाडी आणि ठाकरे गटाच्या स्पर्धेतल्या उमेदवारांना शांत करणं, त्यांची समजूत काढणं इथे मविआची कसोटी लागणार आहे.
 
मोठ्या संख्येने स्पर्धेत असलेले इच्छुक उमेदवार आणि पक्षासाठी अनेक वर्षांपासून मतदारसंघात पक्षाचं काम करत असलेल्या उमेदवारांची जागा दुसऱ्या पक्षाकडे गेली तर निश्चितच अशा उमेदवारांची नाराजी वाढेल असं दीपक भातुसे सांगतात.
“बंडखोरी कशी थांबवायची किंवा त्यावर काय तोडगा काढायचा हा प्रश्न मविआच्या नेत्यांसमोर आहे. शिवसेना आणि आघाडी वर्षानुवर्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढत आले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये आघाडी विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होते. मग अशा ठिकाणी मविआ जागा वाटप करताना विद्यमान आमदार किंवा क्रमांक दोनच्या उमेदवाराचा विचार करेल. पण अशावेळी स्पर्धेत असलेला दुसऱ्या पक्षाचा इच्छुक उमेदवार मात्र नाराज होण्याची शक्यता आहे. अशा उमेदवारांची संख्या वाढल्यास आणि ते अपक्ष म्हणून उभे राहिल्यास मतांची विभागणी होऊन मविआला त्याचा फटका बसू शकतो.” असंही दीपक भातुसे यांना वाटतं.
 
सध्या सुरू असलेल्या बैठका आणि चर्चा मविआला आगामी पूर्ण वर्षभर कराव्या लागतील जेणेकरून नेते, कार्यकर्ते यांच्यात तो उत्साह कायम राहील. जागा वाटप जाहीर व्हायला अजून वेळ असला तरी त्यावरील चर्चा, रस्सीखेच आणि बोलणी ठरेपर्यंत बैठकांचं सत्र सुरू राहील असं दिसतं. तसंच तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याने स्थानिक पातळीवर पक्षाच्या आमदारांकडे आणि पदाधिकाऱ्यांमध्येही मविआची भूमिका स्पष्ट असणं गरजेचं आहे.
 
अभय देशपांडे सांगतात, “कुठल्याही आघाडीत बंडखोरीचा धोका असतोच. तसाच तो मविआमध्येही असणार आहे. दुसऱ्या पक्षाला जागा दिल्यानंतर तिथला इच्छुक उमेदवार स्वस्थ बसेलच असं नाही. त्यामुळे मविआला स्वतंत्रपणे आपल्या पक्षाचा संघटनात्मक विचारही करावा लागणार आहे.”
 
महाविकास आघाडत समन्वय कायम राहणार का?
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं. आजही महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त केली.
 
भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले, “महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत धोरणात्मक निर्णय काय झाला याची माहिती नेत्यांनी दिली. परंतु त्यानंतर नाना पटोले यांनी वृत्तपत्राला दिलेली मुलाखत वाचली. जयंत पाटील यांनीही दिलेली मुलाखत ऐकली. तिघांनी मिळून ठरवलेली बैठक आणि या मुलाखती यात मला वेगळं काहीतरी दिसतंय. मी आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.”
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही भास्कर जाधव यांच्या मताला आपली सहमती दर्शवली आहे. छगन भुजबळ म्हणाले, “भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली असेल तर ती योग्यच आहे. नेत्यांच्या बैठकीतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. बैठकीच्या गोष्टी बाहेर बोलणं चुकीचं आहे.”
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आपण असं कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. “आमच्यात कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असं मी म्हटलो होतो. तेव्हाही हेच सांगितलं आजही तेच सांगतोय. ठरलेलंच नसेल तर ते बाहेर सांगायचा प्रश्न नाही. भास्कर जाधव का नाराज झालेत ते मी फोन करून विचारतो.”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही भास्कर जाधव यांच्या मताला आपली सहमती दर्शवली आहे. छगन भुजबळ म्हणाले, “भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली असेल तर ती योग्यच आहे. नेत्यांच्या बैठकीतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. बैठकीच्या गोष्टी बाहेर बोलणं चुकीचं आहे.”
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आपण असं कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. “आमच्यात कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असं मी म्हटलो होतो. तेव्हाही हेच सांगितलं आजही तेच सांगतोय. ठरलेलंच नसेल तर ते बाहेर सांगायचा प्रश्न नाही. भास्कर जाधव का नाराज झालेत ते मी फोन करून विचारतो.”
 
मविआच्या नेत्यांनी असा जाहीर असमन्वय टाळला पाहिजे, यामुळे मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्येही संभ्रम निर्माण होतो असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात.
 
ते सांगतात, “मविआला यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात एकवाक्यता असणं गरजेचं आहे. त्यांच्या नेत्यांमध्येच मतभेद असतील तर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि गोंधळ असल्याचं दिसून येतं. तुमच्या मोहीमांचाही प्रभाव यामुळे कमी होताना दिसतो. यामुळे मविआला जर एकत्र निवडणुका लढायच्या असतील तर त्यांनी माध्यमांशी बोलताना किंवा जनतेसमोर बोलताना एकमेकांच्या पक्षातील नेत्यांविरोधात बोलणं टाळलं पाहिजे.”
 
तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून मविआवर जोरदार टीका केली जात आहे. 2024 पर्यंत मविआ टिकणार नाही, महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडतील असा दावा भाजपनेचे नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मविआवर टीका केली आहे. शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात पुस्तकातील असे काही मुद्देच वाचून दाखवले आहे.

Published- By- Priya Dixit