मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (08:32 IST)

रागाच्या भरात पतीने केली पत्नीची हत्या

पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली. रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे पाळधी गावात खळबळ माजली आहे. पुजा पवार (पाळधी)असे हत्या झालेल्या पत्नीचे तर सुनिल पवार (गेंदालाल मिल जळगाव) असे हत्या करणा-या पतीचे नाव आहे.
 
पतीसोबत होणा-या घरगुती जाचाला कंटाळून पुजा पवार ही विवाहीता जळगाव येथून तिच्या माहेरी पाळधी येथे राहण्यास आली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ती पाळधी येथेच मुक्कामी होती. तिने पतीविरुद्ध पाळधी दुरक्षेत्र येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे चौकशीकामी त्याला पोलिसांनी बोलावले होते. तो राग त्याच्या मनात होता. तो राग मनात ठेवत त्याने पाळधी येथील मारवाडी गल्लीत तिला गाठले. संतापाच्या भरात त्याने तिच्यावर चाकूचे वार केले. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली व मृत्युमुखी पडली. त्यानंतर त्याने तिचा भाऊ शंकर चव्हाण याच्यावर देखील हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याचे समजते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज पाळधी दुरक्षेत्र येथे सुरु होते. स.पो.नि.गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामकाज सुरु आहे.