शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (18:48 IST)

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत आहे. पण मुख्यमंत्री होणं तेवढं सोपं नाही : जयंत पाटील

राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या प्रत्येक नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा असते. दरम्यान, आता हिच इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. २० वर्षाहून अधिक वर्ष राजकारणात काम केल्यानंतर मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघण हे दिवा स्वप्न नाही, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत बोलाताना त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत आहे. पण मुख्यमंत्री होणं तेवढं सोपं नाही आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
 
जयंत पाटील यांनी मुलाखत देताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु पुरेसं संख्याबळ असणं ते देखील महत्त्वाचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. “मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा आहे. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावं असं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल, शरद पवार जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असतो. दिर्घकाळ काम करणाऱ्या सर्वांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असते. मलाही आहे. माझ्या मतदारांनाही वाटत असावं. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदारही आहेत. त्यामुळे इच्छा आहे. परंतु, परिस्थिती, संख्या…आमची संख्या ५४ आहे. त्यामुळे ५४ वर मुख्यमंत्री होणं मला नाही वाटत शक्य आहे. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. त्यानंतर पक्ष वाढला, संख्या वाढली तर मग शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.