मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (17:12 IST)

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार

शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्यसभेत आक्रमक झालेल्या खासदारांची पाठराखण केली. तसेच, विधेयक पारित करण्यात सरकारकडून राबवण्यात आलेलं धोरण आणि खासदारांचं निलंबन याविरोधात खासदारांनी केलेल्या आंदोलनात मीही सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे, असं शरद पवारांनी जाहीर केलं. तसेच, ‘ज्या बिलावर ३ ते ४ दिवस चर्चा होणं आवश्यक होतं, ते बिल रेटून नेण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं. हे बिल सत्ताधाऱ्यांकडून तातडीने मंजूर करून घेण्याचा आग्रह होता. त्यावर सदस्यांची मतं विचारात घेतली गेली नाहीत, मतं मांडण्याची संधी सदस्यांना देण्यात आली नाही’, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
 
शरद पवार म्हणाले, ‘राज्यसभेत मांडलेल्या विधेयकावर काही सदस्यांना आपली भूमिका मांडायची होती, मतं द्यायची होती. मात्र, त्यांना ती संधी न देता विधेयक पुढे रेटून नेलं. उपसभापतींची ही कृतीच लोकशाहीविरोधी आहे. मी ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय पद्धतीमध्ये काम केलं आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचं वर्तन अजिबात अपेक्षित नव्हतं’, असं म्हणत शरद पवारांनी टीका केली आहे.