1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. I am not a coward like Narayan Ran - Sanjay Raut

नारायण राणेंसारखा डरपोक आणि पळपुटे आम्ही नाही -संजय राऊत

sanjay raut
नारायण राणेंसारखा डरपोक आणि पळपुटे आम्ही नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. कोणाला हिंमतीच्या आणि धाडसाच्या गोष्टी बोलता. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या जर देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे. 
 
संजय राऊत म्हणाले की, माझ्या नादाला लागू नका, राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग मी दाखवतो. झाकली मूठ सव्वालाखाची. हे काय मला जेलमध्ये पाठवणार, मी हिंमतीने माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलोय. तुमच्यासारखा पळून गेलो नाही. ईडीने बोलवल्यावर शरणागती पत्करली नाही. नामर्द नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत असं त्यांनी सांगितले. 
 
त्याचसोबत मला जेलमध्ये घाला, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का? या सर्वांची माझ्याकडे नोंद आहे. ते सगळं चीफ जस्टीस ऑफ इंडियाला पाठवली आहे. इकडच्या प्रत्येकाचं वक्तव्य़ आम्ही पाठवत आहोत. नारायण राणेंची सगळी आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्ष सुटणार नाहीत असा इशाराही संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
ऑक्टानाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स एलएलपी १ कोटी ८० लाख ३ हजार रुपयांचा गंडा ,गुंतवणूकदार हवालदिल