गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (21:11 IST)

संजय राठोड यांच्याविरोधात अनावश्यक टीका केल्यास त्यांची जागा दाखवून देऊ- महंत सुनील महाराज

Religious Council of Banjara Community at Pohradevi Mahant Sunil Maharaj warned
बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी, ‘यापुढे कोणीही संजय राठोड यांच्याविरोधात अनावश्यक टीका केल्यास, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ’, अशा शब्दात इशारा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर संजय राठोड यांच्याविरोधात युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपावरून टीका होत आहे.
 
रविवारी पोहरादेवी (जि. वाशीम) येथे बंजारा समाजाची धर्म परिषद होत आहे. या पार्श्वभूमीवर महंत सुनील महाराज यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या धर्म परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश मंत्री संजय राठोड यांनाही देण्यात आल्याचे सुनील महाराज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. पोहरादेवी येथे धर्मगुरू व महंतांच्या उपस्थितीत होत असलेल्या या धर्म परिषदेस बंजारा समाजातील नायक, कारभारी, डाव आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संजय राठोड हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याने, ही परिषद राजकीय शक्तिप्रदर्शन असल्याचेही सांगण्यात येत आहे. या परिषदेत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीवर मंथन करण्यात येणार आहे. समाजातील संजय राठोड यांची मंत्रीपदी नियुक्ती होताच विरोधक पोलिसांनी ‘क्लीन चिट’ दिलेल्या एका प्रकरणाशी संबंध जोडून त्यांच्यावर टीका करत आहे.

या दृष्टीने बंजारा समाजाची ठोस राजकीय भूमिका या धर्म परिषदेत ठरवली जाणार आहे. या परिषदेस धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितू महाराज, महंत सुनील महाराज, महंत शेखर महाराज, महंत यशवंत महाराज यांच्यासह बंजारा समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.