मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (10:16 IST)

विदर्भातील ही नदी होणार पुनर्जीवित तर लावणार ६० लाख झाडे

राज्य शासन आणि इशा फाऊंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यातील वाघाडी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘रॅली फॉर रिव्हर’ प्रकल्पात सहभागी यवतमाळ आणि घाटंजी तालुक्यातील 40 गावांमध्ये 60 लक्ष झाडे लावण्याचे नियोजन आहे. झाडांमुळे पाणी आणि पाण्यामुळे समृध्दी हे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे घोषवाक्य आहे.
 
याच उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधक डॉ. प्रमोद यादगीरवार, इशा फाऊंडेशनचे प्रतिनिधी कृष्णन सितारामन आदी उपस्थित होते.
 
वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत माहिती देतांना कृष्णन सितारामन म्हणाले, मानवी जीवन हे नदी खो-यात समृध्द झाले आहे. पावसाच्या पाण्यावर जनजीवन अवलंबून असल्यामुळे पावसाचे पाणी नदीपात्रात पडणे आवश्यक आहे. त्यासाठी नद्यांच्या आजूबाजूला झाडे लावणे गरजेचे आहे. याच उद्देशाने 2017 मध्ये ‘रॅली फॉर रिव्हर’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. देशात सर्वात आघाडीवर महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पांतर्गत काम सुरू केले. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीची निवड करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत यवतमाळ आणि घाटंजी तालुक्यातील 40 गावांमध्ये 60 लक्ष झाडे लावण्याचा इशा फाऊंडेशनचा संकल्प आहे.
 
पुढे ते म्हणाले, जेथे झाडांची संख्या जास्त तेथे पाऊस जास्त पडतो, असा निष्कर्ष आहे. म्हणून नदीच्या आजुबाजुच्या परिसरात झाडे लावली तर पावसाचे पाणी नदीच्या पात्रात जाण्याची शक्यता अधिक असते. ‘रॅली फॉर रिव्हर’ या उपक्रमाला केंद्र शासनाने मंजूरी दिली असून नीती आयोगानेसुध्दा या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. राज्य शासनाने यात वेगाने पाऊले टाकली असून या अंतर्गत यवतमाळ आणि घाटंजी तालुक्यातील 40 गावांमध्ये सुक्ष्मसिंचन, फळबाग लागवड, शेतक-यांसाठी प्रक्रिया उद्योग, आर्थिक उत्पन्नाचे मॉडेल आदी विकसीत करण्यात येईल, असेही सितारामन यांनी सांगितले.
 
वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत 54 कि.मी. वाघाडी नदीची लांबी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पात यवतमाळ तालुक्यातील 21 गावे व घाटंजी तालुक्यातील 19 गावांचा समावेश असून एक आदर्श गावाचा समावेश आहे. प्रकल्पातील एकूण गावांपैकी 24 गावे जलयुक्त शिवार अभियानामध्ये, 12 गावे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत 6 गावे, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत 11 गावे व एका गावाचा आदर्श गावामध्ये समावेश आहे. सदर प्रकल्पात 29 हजार 911 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यात खाजगी क्षेत्र 63 टक्के, वनक्षेत्र 23 टक्के, शासकीय क्षेत्र 9 टक्के व रहिवासी क्षेत्र 5 टक्के आहे.