शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (18:09 IST)

आम्हाला तुरुंगात टाकलं, तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल; संजय राऊतांचा भाजप नेत्यांना इशारा

sanjay raut
शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खा. संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांवरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. सरकार पाडण्यासाठी माझ्यासह शरद पवारांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. मात्र या सर्वांची मी पोलखोल करणार आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल, असा रोखठोक इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
 
संजय राऊत यांनी आज राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि शरद पवार यांना एक पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमधून संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपावर गंभीर आरोप केले. केंद्रातलं सरकार आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर करतंय. त्याची माहिती राज्यसभेच्या सभापतींना माहिती द्यावी म्हणून मी हे पत्र लिहिलं आहे. ईडी आणि इतर राष्ट्रीय तपाय यंत्रणा ह्या भाजपच्या आणि त्यांच्या इतर मालकांच्या क्रिमिनल सिंडिटेच्या भाग बनल्या आहेत. आजचं पत्र हे केवळ माहितीसाठी आहे. तो ट्रेलर नाही. ट्रेलर अजून यायच्या आहेत. या यंत्रणा ब्लॅकमेल करतात. यांचे एजंट आहेत. याचे पुरावे मी देणार आहे.
 
या यंत्रणा ठाकरे परिवाराला बदनाम करत आहेत. माझ्यासारख्या नेत्यांना बदनाम करत आहेत. शरद पवार यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये तपास यंत्रणा आहेत. त्या आधी तपास करतील. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्यावर तुम्ही आलाय का. तुम्ही फेडरल सिस्टिमची वाट लावताय. त्यामुळे यांची संपूर्ण पोलखोल करावी लागेल. याबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. ही सुरुवात आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
 
भाजपाचे नेते आम्हाला अनिल देशमुख यांच्या शेजारच्या कोठडीत जावं लागेल, अशा धमक्या देताहेत. पण लक्षात ठेवा. आम्हाला तुरुंगात पाठवलं तर आमच्या पाठोपाठ तुम्हालाही तुरुंगात यावं लागेल. कारण तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
 
ईडीला ज्या कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या त्यांनी करत राहावे. पण एक सांगतो तुमचा चेहरा समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही. ईडीच्या कार्यालयात काय चालतं हे मी समोर आणल्याशिवाय नाही. हे लोक मुंबईत दादागिरी करतात. बाहेरच्या एजन्सी महाराष्ट्राच्या नागरिकांना, मुंबईच्या नागरिकांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवतात. मुंबई पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बाहेरचे हे लोक सुपाऱ्या घेऊन येतात. १२-१२ तास डांबून ठेवतात. धमक्या देता. काही लोकं ज्यांना धमक्या दिल्या आहेत ते याविरोधात तक्रार करणात आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
 
यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनाही इशारा दिला. ते म्हणाले की, ही मुंबई आहे. मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची पाहाच. देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतोय. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे ते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार आहे. आता पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवनात आणि त्यानंतरची पत्रकार परिषद ही ईडीच्या कार्यालयासमोर घेणार आहे. त्या मोठा गौप्यस्फोट करणार, असे संकेतही संजय राऊत यांनी दिले आहेत.